बायांनो, मागे राहू नका, लिहिते व्हा! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

पिंपरी - स्त्री साहित्याकडे कुचेष्टेने पाहण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. स्त्रियांनी न लाजता, न कचरता आपले अनुभव कथन केले पाहिजेत. साहित्यांच्या व्यवहारामध्ये आता महिलांनी मागे राहायचे नसल्याने "बायांनो, लिहिते व्हा!', असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांनी केले. 

पिंपरी - स्त्री साहित्याकडे कुचेष्टेने पाहण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. स्त्रियांनी न लाजता, न कचरता आपले अनुभव कथन केले पाहिजेत. साहित्यांच्या व्यवहारामध्ये आता महिलांनी मागे राहायचे नसल्याने "बायांनो, लिहिते व्हा!', असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांनी केले. 

स्वानंद महिला संस्था आणि ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोन महिला विभाग यांच्यातर्फे आयोजित अखिल भारतीय बारावे स्त्री साहित्य कला संमेलनाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. 6) पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात झाले. त्या वेळी डॉ. वाड बोलत होत्या. जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय अध्यक्षा रुचिरा सुराणा, उद्योजिका मंगला संचेती, स्वानंदच्या संस्थापक अध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया यांच्यासह अनेक मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

डॉ. वाड म्हणाल्या, ""स्त्रियांनो, जिथे राहता तिथे साहित्यिक क्‍लब तयार करा. दर महिन्याला दोन पुस्तकांचे वाचन करून त्याचे रसग्रहण करा. आपले अनुभव कथन लिहा. त्यामुळे टीव्हीपासून बाजूला होऊन स्वतःचा विचार करू लागाल. करण्यासारखे आणि बघण्यासारखे काहीच नसल्याने आपण टीव्हीवरील मालिका पाहतो. यामुळे लिहा, वाचा आणि अनुभव संग्रह करा. वयाच्या चौथ्या वर्षी मी पुस्तकांना आपले मित्र बनविले. तसेच आपल्या मुलांना दर महिन्याच्या बजेटमध्ये वाचनाकरिता काहीतरी आणून द्या. पुस्तके हे विचारांचे पहिले माध्यम आहे. म्हणून साहित्यांच्या व्यवहारामध्ये आता महिलांनी मागे राहायचं नाही. त्यामुळे बायांनो, लिहिते व्हा. टीकेकडे जो सकारात्मक नजरेने बघतो, तो खरा साहित्यिक. आज तुमच्यावर टीका करणारे उद्या तुमच्या कामगिरीचे कौतुक करतील. दिसण्याला वय असले तरी लिखाणाला वय नसते. कोणत्याही वयात लिखाणाला सुरवात करता येते. साहित्याच्या बाबतीत महिलांनी स्वतःला कमी लेखू नये. त्यांनीही आपल्या मनातील लिहिले पाहिजे. मुलीने जर उंच भरारी घेतली आणि ती खाली पडली, तर तिच्या पित्याने सर्कशीतील जाळीप्रमाणे तिचे रक्षण केले पाहिजे. अशी जाळी आणि मायेचा पदर ज्या घरात आहे, तिथे काय बिशाद की मुलगी आत्महत्या करेल. आपल्या मुलीला आत्मविश्‍वास आई आणि वडिलांनी दिला पाहिजे.'' 

महिलांची व्यथा मांडताना डॉ. वाड म्हणाल्या, ""आपल्याकडे एक पालकत्व स्वीकारलेल्या महिलेला किती जण मदत करतात? बलात्काराच्या घटनेचा आपण जोरदार निषेध करतो; पण बलात्कार पीडित महिलेचे किती जण पुनर्वसन करतात? घटस्फोटित स्त्रीचे दुःख किती जणांना ठाऊक आहे? तिच्याकडे एखादी टाकाऊ वस्तू म्हणून बघू नका. तिने ज्या वेदना सोसल्या आहेत, त्या साहित्य रूपात आल्या पाहिजेत. त्यामुळे पुढचीस ठेच मागची शहाणी होणार आहे. प्रत्येक प्रकारचे साहित्य लिहिले गेले पाहिजे.'' 

उपस्थितीबद्दल पुरुषांचे अभिनंदन 
स्त्री साहित्य कला संमेलनात पुरुषांची उपस्थितीही लक्ष वेधून घेणारी होती. याबाबत संमेलनाध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी मुख्य संयोजिका प्रा. सुरेखा कटारिया यांचे खास शैलीत अभिनंदन केले. तसेच संकेतस्थळ आणि सीडीचे उद्‌घाटन करताना पुरुषांना आमंत्रित केल्याबद्दलही मिस्कील शैलीत कौतुक केले.

Web Title: Dr Vijaya Wad Do not stay behind