खळदकरांनी आणलं पाणी !

खळदकरांनी आणलं पाणी !

पुणे - खळद... पुरंदर तालुक्‍यातील कऱ्हा नदीकाठी वसलेलं एक टुमदार गाव. नदी असूनही दुष्काळ व नापिकीचे संकट शेतकऱ्यांना कायमच भेडसावत होते. उदरनिर्वाहासाठी मुंबई-पुण्याची वाट धरलेल्या ग्रामस्थांना मात्र ही समस्या स्वस्थ बसू देत नव्हती. सगळ्यांनी एकत्र येत "आम्ही खळदकर‘ ही संस्था स्थापन करत गावातील पाणीप्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य दिले. अखेर सर्वांच्याच सामूहिक प्रयत्नातून खळदच्या शिवारात पाणी खेळू लागले. 

तब्बल 3200 एकर क्षेत्र असलेल्या खळदच्या उशालाच असलेली कऱ्हा नदी व ओढे-नाले पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. तरीही बारमाही ओलिताखाली असलेली जमीन काही प्रमाणातच होती. त्यातच दुष्काळ व नापिकीचे शल्य गावकऱ्यांच्या मनाला कायम बोचत होते. या समस्येमुळेच शंभरहून अधिक जण रोजगाराच्या निमित्ताने शहरांमध्ये स्थलांतरित झाले. परंतु, गावाशी असलेली त्यांची नाळ कधी तुटली नाही. त्या सगळ्यांनी वर्षभरापूर्वी "आम्ही खळदकर‘ या संस्थेच्या निमित्ताने एकत्र येत पाणीसमस्या दूर करण्याचे आव्हान पेलले.

"आम्ही खळदकर‘चे उपाध्यक्ष व उद्योजक कृष्णकांत रासकर म्हणाले, ""पावसाळ्यात नदी, ओढे-नाले दुथडी भरून वाहूनही पाण्याचा प्रश्‍न कायम होता. हे चित्र बदलण्यासाठी ओढ्या-नाल्यांवर पक्के सिमेंट, कोल्हापूर पद्धती, दगड-माती व कच्चे असे विविध प्रकारांचे बंधारे बांधले. पूर्वी केलेल्या बंधाऱ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण केले. त्याचा फायदा आता पावसाळ्यात होईल. नदीकाठी दोन मोठ्या विहिरी घेतल्या आहेत. त्यातील पाणी तीन व चार किलोमीटरच्या दोन मोठ्या पाइपलाइनद्वारे बंधाऱ्यात टाकण्यात येते. त्यामुळे गावापुढील पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत झाली आहे.‘‘

संस्थेचे अध्यक्ष शिवाजी कादबाने, नंदू कामथे, किशोर चव्हाण व कैलास कामथे यांनी विशेष मदत केली. याबरोबरच सरपंच मालन कामथे, उपसरपंच सुरेश रासकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला व तरुणांमुळे या कामाला गती मिळाली. शासकीय मदतीशिवाय लोकवर्गणीतून हे काम उभे राहू शकले. आता उर्वरित कामास लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी अनेक कंपन्या, बॅंका व सामाजिक संस्था पुढे येऊ लागल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com