अमली पदार्थ तस्करांविरुद्ध गुन्हे शाखेकडून मोहीम तीव्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक आणि दरोडा प्रतिबंधक पथकाने गेल्या काही दिवसांत अमली पदार्थांच्या तस्करांना जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. शहरात पाळेमुळे घट्ट रोवू पाहणाऱ्या ड्रग्ज माफियांचे वेळीच कंबरडे मोडल्यास येणारी पिढी नशेच्या आहारी जाण्यापासून दूर राहील.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक आणि दरोडा प्रतिबंधक पथकाने गेल्या काही दिवसांत अमली पदार्थांच्या तस्करांना जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. शहरात पाळेमुळे घट्ट रोवू पाहणाऱ्या ड्रग्ज माफियांचे वेळीच कंबरडे मोडल्यास येणारी पिढी नशेच्या आहारी जाण्यापासून दूर राहील.

शहरात रेल्वे स्टेशन परिसर, कोरेगाव पार्क, काही पब्ज आणि नामांकित महाविद्यालयांच्या परिसरात हॉटेल्समधून अमली पदार्थांची विक्री केली जात आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी शहराला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्‍त करण्याचा विडा उचलला आहे. गेल्या काही दिवसांत गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक आणि दरोडा प्रतिबंधक पथकाने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्धची मोहीम तीव्र केल्याचे दिसून येत आहे. 

पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी, पोलिस निरीक्षक स्वाती थोरात यांच्यासह पथकातील सहायक निरीक्षक अजय वाघमारे, संजय ठेंगे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी ब्राऊन शुगर तस्कर अली याला खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अटक केली. अली हा पिंपरी, खडक आणि अन्य परिसरात काही तरुणांच्या मदतीने ड्रग्ज विकत असल्याचे तपासात समोर आले आहे.

अलीने पोलिसांना पकडून दाखवाच, असे आव्हान दिले होते. पुणे ग्रामीण पोलिस दलातील निलंबित हवालदार नितीन सूर्यवंशी हासुद्धा ड्रग्ज तस्करी करत होता. अमली पदार्थविरोधी पथक त्याच्यावर काही दिवस पाळत ठेवून होते. अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या तीन महिन्यांत सव्वा लाखाचे कोकेन, साडेपाच लाख रुपयांचे मेफेड्रॉन आणि ६१ हजार रुपये किमतीचे अफीम जप्त केले. १३ लाख रुपयांचे हेरॉइन, ब्राऊन शुगर, तसेच गांजा आणि मिक्‍स तरंगच्या गोळ्या जप्त केल्या. अशा प्रकारे एकूण १६ आरोपींना अटक करून २१ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. 

गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्‍त आयुक्‍त दीपक साकोरे, पोलिस उपायुक्‍त पी. आर. पाटील, सहायक आयुक्‍त सुरेश भोसले आणि दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश जगताप यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी शहरात तस्करांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. कोरेगाव पार्क, बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोकेन विकणाऱ्या तीन नायजेरियनला अटक करण्यात आली. सिंहगड रस्ता परिसरातून ६५ लाख रुपये किमतीचे एक किलो हेरॉइन जप्त केले. अफीम विकणाऱ्या राजस्थानी टोळीकडून पाच किलो अफीम जप्त केले. तसेच चरस विकणाऱ्या नगर जिल्ह्यातील टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १४ लाख रुपयांचे साडेतीन किलो चरस जप्त करण्यात पोलिसांना यश आले. आरोपींमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या माजी जवानाचाही समावेश होता. या पोलिस कारवायांवरून ड्रग्ज माफीयांविरुद्ध विळखा घट्ट होत चालला आहे, हे नक्‍की.