पुन्हा कोरडी आश्‍वासने...

पुन्हा कोरडी आश्‍वासने...

मेट्रो, एसआरए सोडल्यास इतर प्रश्‍न दुर्लक्षितच

पुणे - दिवसेंदिवस वेगाने पसरत चाललेल्या गरजा आणि अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पुण्याच्या पदरात नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा आश्‍वासनांशिवाय फारसे काही पडले नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची सुधारित नियमावली आणि ‘मेट्रो प्रकल्पा’ला मिळालेला हिरवा कंदील एवढेच काय ते दान पुण्याला मिळाले. अधिवेशनाचा कमी कालावधी, नोटाबंदी, मराठा आरक्षण आणि मंत्रिमहादेव जानकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या गोंधळामुळे विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज पूर्ण वेळ चालू शकले नाही. 

वाहतूक कोंडी, अपुरी वाहतूक व्यवस्था हा सर्वांत गंभीर प्रश्‍न सोडविण्यासाठी ‘मेट्रो प्रकल्पा’ला मंजुरी दिली असली, तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अपेक्षित निर्णय झाले नाहीत.

शहरालगतच्या ‘रिंग रोड’चा वादाबाबत अधिवेशनात चर्चाही होऊ शकली नाही. राज्य सरकारकडे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची सुधारित नियमावली प्रलंबित असल्याने पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे प्रस्ताव पडून राहिले आहेत. याला गती देण्यासंदर्भात आमदार ॲड. जयदेव गायकवाड, अनिल भोसले यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर चर्चा झाली नाही, परंतु लवकरच नियमावली मंजूर होईल, मुंबई आणि ठाणे महापालिकेत झोपडपट्टी विकसकाला देण्यात येणाऱ्या ‘टीडीआर’चे प्रमाण ठरविले जाईल आणि त्या आधारे पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी विकसकाला ‘टीडीआर’ देण्याचे प्रमाण ठरविले जाईल, असे आश्‍वासन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिले. 

शहरात राबविण्यात येणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेतील टाक्‍यांच्या बांधकामाच्या निविदा प्रक्रियेत गैर प्रकार झाल्याकडे आमदार अनिल भोसले, अनंत गाडगीळ यांनी लक्ष वेधले होते. या निविदा प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती मिळाली असली, तरी हा विषय पारदर्शीपणे मार्गी लागेल का? याकडे लक्ष लागले आहे.

विधानसभेच्या तुलनेत विधान परिषदेत पुण्यातील आमदार शरद रणपिसे, ॲड. जयदेव गायकवाड, डॉ. नीलम गोऱ्हे, भोसले, गाडगीळ यांनी राज्यातील इतर प्रश्‍नांवरील चर्चेत सहभाग नोंदविला. विधानसभेत आमदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, विजय काळे, माधुरी मिसाळ यांचे तारांकित प्रश्‍न पटलावर ठेवले गेले. कुलकर्णी, तापकीर यांच्या एक दोन प्रश्‍नांवरच सभागृहात चर्चा झाली. धनकवडी येथील टीडीआर गैरव्यवहाराबाबतच्या तारांकित प्रश्‍नावर अर्धा तास चर्चेची काळे यांची मागणी अध्यक्षांनी मान्य केली होती, पण त्यावरही गोंधळामुळे चर्चा होऊ शकली नाही. 

कुलकर्णी यांनी अपंग शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नावर राज्य सरकारकडून ठोस आश्‍वासन मिळविले. योगेश टिळेकर यांचा एक तारांकित प्रश्‍न पटलावर ठेवला गेला. जगदीश मुळीक यांचा एकही प्रश्‍न पटलावर ठेवला गेला नाही. जिल्ह्यातील आमदार संग्राम थोपटे यांनी वेल्हा येथे नगर परिषद स्थापन करण्याचा मुद्दा उपस्थित केला. शरद सोनवणे, बाबूराव पाचर्णे, राहुल कुल यांनीही प्रश्‍न उपस्थित केले होते. पण त्यावरही चर्चा झाली नाही. पिंपरी चिंचवड येथे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरू करण्याविषयी अधिवेशनात आश्‍वासन मिळाले.

या विषयांवर निर्णय नाही
पीएमआरडीला पायाभूत सुविधा पुरविणे
रिंग रोड, लोणावळा-पुणे-हडपसर-दौंड लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा
नवीन गावांचा विकास आराखडा, बीडीपीमधील बांधकामाचे प्रमाण ठरविणे
कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जागेची उपलब्धता
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची पुण्यात स्थापना
ससूनच्या धर्तीवर शहरांत चार दिशांना रुग्णालयांची उभारणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com