ई-कचऱ्याने आरोग्याच्या प्रश्‍नांचे डोंगर

ई-कचऱ्याने आरोग्याच्या प्रश्‍नांचे डोंगर

90 टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत गोंधळ, कायदा कठोर राबवण्याची गरज
पुणे - पुण्या-मुंबईसह देशातील प्रमुख शहरातील ई-कचऱ्याची समस्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बनली आहे. पुण्यामध्ये मागील वर्षात तब्बल सात हजार मेट्रिक टन ई-कचरा वाढल्याचे आकडेवारीतून दिसते. सातत्याने वाढणाऱ्या, परंतु प्रक्रियेविना पडून राहणाऱ्या 90 टक्के ई-कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, याबाबत नागरिकांपासून स्थानिक प्रशासनापर्यंत सर्वत्रच गोंधळाची स्थिती आहे.

राज्यात ई-कचरा स्वीकारण्यासाठी एकूण 42 अधिकृत केंद्रे आहेत, तर 5 अधिकृत पुनर्प्रक्रिया केंद्र आणि 27 विलगीकरण (डिस्मॅंटल) केंद्र आहेत. राज्य सरकारकडून सर्व महापालिका आणि नगरपालिकांना ई-कचऱ्याबाबतच्या कायद्याची अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या कचऱ्याची समस्या आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी अधिकाधिक जनजागृतीची गरज आहे.

विषारी घटक आरोग्याला घातक
घरात निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्यामध्ये संगणक, टीव्ही, मोबाईल, फ्रीज अशा उत्पादनांचा समावेश असतो. त्यामध्ये सुमारे एक हजार घातक (टॉक्‍सिक) पदार्थांचा वापर केलेला असतो. ज्यामुळे जमीन आणि त्याखालील पाणी प्रदूषित होऊ शकते. घातक पदार्थ म्हणजे कॅडमियम, पारा (मर्क्‍युरी), शिसे (लीड), हेक्‍साव्हॅलेंट क्रोमियम, प्लॅस्टिक, पीव्हीसी, बीएफआर, बेरिलियम यांच्यासह कार्बन ब्लॅक आणि जड धातू (हेवी मेटल्स) यांसारखे कार्सिनोजेन्स यांचा समावेश या उत्पादनांमध्ये असतो. त्यांच्या संपर्कात कोणी आल्यास सतत डोके दुखणे, चिडचिड होणे, मळमळणे, उलट्या होणे आणि डोळे व मेंदूशी संबंधित आजार होण्याचा धोका संभवतो. पुनर्प्रक्रियेशी संबंधित असलेल्यांना यकृत, मूत्रपिंड आणि मेंदूशी संबंधित आजार होण्याची शक्‍यता असते.

प्रिंटेड सर्किट बोर्डमध्ये (पीसीबी) अँटिमोनी, क्रोमियम, जस्त (झिंक), शिसे, टीन, तांबे, सोने आणि चांदी अशा जड धातूंचा वापर असतो. "पीसीबीं‘मधून हे पदार्थ काढून घेण्याचा मोह अनेकांना होतो. मात्र, ही प्रक्रिया धोकादायक असते. त्यासाठी पीसीबी उघड्यावर तापविण्याचे प्रकार होतात. अप्रशिक्षित व्यक्तींकडून "रिसायकल‘साठी अशास्त्रीय आणि धोकादायक पद्धतींचा वापर होतो. त्यामध्ये ऍसिड स्ट्रिपिंग आणि उघड्यावर ई-कचरा जाळण्याचे प्रकार घडतात. या पद्धती अत्यंत धोकादायक असतात. त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे हवेमध्ये घातक पदार्थ सोडले जातात. ई-कचऱ्याचे विघटन शास्त्रीय पद्धतीने केल्यास पर्यावरणाची हानी टाळता येते. एवढेच नाही, तर पुनर्प्रक्रिया केल्यानंतर ई-कचऱ्यातून काही साहित्य वेगळे काढून त्याचा पुनर्वापर करणे शक्‍य असते.

कशी विल्हेवाट लावली जाते
"डोंबिवलीच्या रिस्पोस वेस्ट मॅनेजमेंट अँड रिसर्च‘चे सुजित कोचरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनर्प्रक्रिया केंद्रामध्ये जमा झालेल्या ई-कचऱ्यातील सुटे भाग हत्यारांच्या मदतीने वेगळे केले जातात. चालू स्थितीतील भाग पुनर्विक्रीसाठी पाठवले जातात. उर्वरित भाग (प्लॅस्टिक, लोखंड, ऍल्युमिनियम, पत्रे, तांबे, काच, रबर इत्यादी) वेगळे काढतात. खऱ्या अर्थाने रिसायक्‍लिंगची गरज सर्किट बोर्ड आणि वायरसाठी लागते. या दोन्हीतील घातक घटक वेगळे काढता येत नाहीत. त्यामुळे या उत्पादनाला तोडून त्याचे बारीक तुकडे आणि नंतर मशिनच्या साह्याने पावडर केली जाते. पावडर करण्यापूर्वी या बारीक तुकड्यांचा प्रवास चुंबकीय क्षेत्रातून होतो. त्यातील लोखंडाचे तुकडे वेगळे काढले जातात. उर्वरित तुकड्यांची एक ते दीड मिलिमीटर जाडीची पावडर केली जाते. या पावडरमध्ये धातू व इपॉक्‍सी कणांचे मिश्रण असते. एका विलिगीकरणाच्या उपकरणातून (सेपरेशन युनिट) धातू व ईपॉक्‍सीचे कण वेगळे काढले जातात. प्रक्रियेदरम्यान उडणारी धूळमिश्रित हवा पाइपद्वारे शुद्धीकरण यंत्रात पाठविली जाते. त्यातून शुद्ध झालेली हवा बाहेर सोडली जाते.

मानवी जीवनावर ई-कचऱ्याचे होणारे परिणाम
क्र -- धातूचे नाव -- कोणत्या वस्तूंमध्ये वापरतात -- बाधा होऊ शकणारा शरीराचा भाग/परिणाम
1. अँटिमनी -- बॅटरी, डायोड्‌स, सेमीकंडक्‍टर्स, इन्फ्रारेड डिटेक्‍ट्‌स -- डोळे, त्वचा, फुफ्फुसे व हृदयात जळजळ
2. सेरियम -- फ्ल्युरोसेंट व ऊर्जाबचत करणारे दिवे -- यकृत, फुफ्फुसे
3. बिस्मथ -- कमी तापमानास वितळणारे सॉल्डरिंग, कृत्रिम धागे (फायबर), रबर -- श्‍वसन, त्वचेचे आजार, निद्रानाश, नैराश्‍य, सांधेदुखी
4. सोने -- सॉल्डरिंगची क्षमता सुधारण्यासाठी सुवर्णमुलामा -- त्वचा, डोळे यांचा दाह आणि ऍलर्जिक रिऍक्‍शन
5. चांदी -- उच्च दर्जाच्या जस्ताची निर्मिती, दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरी -- मूत्रपिंड, डोळे, फुफ्फुसे, यकृत, मेंदू यांना हानी
6. बेरियम -- फ्ल्यूरोसेंट दिवे -- श्‍वसन, हृदय, उच्च रक्तदाब, पोटात जळजळ, मेंदू, यकृत, मूत्रपिंडावर विपरित परिणाम
7. कॅडमियम -- कोटिंग व प्लेटिंग प्रक्रिया, बॅटरी -- फुफ्फुसांना इजा, मध्यवर्ती मज्जासंस्थेची हानी, कर्करोगाचा धोका
8. तांबे -- यंत्रसामग्री, केबल्स, दिव्यांची व पंख्याची बटणे (स्विच) -- डोके, पोटदुखी, चक्कर येणे, यकृत व मूत्रपिंडाचे नुकसान
9. शिसे -- लेड ऍसिड बॅटरी, केबल्स, सॉल्डरिंग, संगणक व टीव्हीच्या पडद्यांची काच -- हिमोग्लोबिनच्या बायोसिंथेसिसमध्ये विस्कळितपणा, गर्भपात, बालकांतील वर्तनविषयक समस्या
10. टिन -- टिन कोटिंग, इलेक्‍ट्रिक सर्किट्‌स, गॅस सेन्सर अलार्म -- डोळे, त्वचेचा दाह, डोके व पोटदुखी, धाप लागणे

देशातील एकूण ई-कचरानिर्मिती
वर्ष --------- लाख मेट्रिक टन

2015 - 15
2016 - 18.5
2018 - 30 (अंदाजित)
(स्रोत - दी असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचॅम) अहवाल एप्रिल 2016)

सर्वाधिक ई-कचरा असलेली शहरे
शहर -- कचऱ्याचे प्रमाण 2016 -- कचऱ्याचे प्रमाण 2015 (मेट्रिक टनमध्ये)

मुंबई -- 1,20,000 -- 96,000
दिल्ली -- 98,000 -- 67,000
बंगळूर -- 92,000 -- 57,000
चेन्नई -- 67,000 -- 47,000
कोलकाता -- 55,000 -- 35,000
अहमदाबाद -- 36,000 -- 26,000
हैदराबाद -- 32,000 -- 25,000
पुणे -- 26,000 - 19,000

ई-कचरा वास्तव आणि समस्या
- एकूण ई-कचऱ्यापैकी फक्त 2.5 टक्‍क्‍यांचाच पुनर्वापर (रिसायकलचे प्रमाण)
- पायाभूत सुविधा, प्रभावी कायद्याअभावी पुनर्वापराचे प्रमाण कमी
- 95 टक्के ई-कचऱ्याची हाताळणी अप्रशिक्षित, असंघटित कामगारांकडून
- ई-कचरा गोळा करण्यासाठी 10 ते 14 वयोगटातील अंदाजे पाच लाख मुलांचा वापर, त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
- ई-कचरा गोदामे आणि पुनर्प्रक्रिया केंद्रांवर पुरेसे संरक्षण व उपाययोजनांचा अभाव
- सरकारी व खासगी औद्योगिक क्षेत्रातून 70 टक्के ई-कचऱ्याची निर्मिती
- नियमावली आणि ई-कचरा स्वीकार केंद्रांच्या असुविधेमुळे बहुतांश ई-कचरा असंघटित व अप्रशिक्षित व्यक्तींच्या हाती
- ई-कचऱ्यातून मिळालेल्या तांब्याचा किलोचा दर - 350-400 रुपये
- ई-कचऱ्यातून मिळालेल्या ऍल्युमिनियमचा किलोचा दर - 110-130 रुपये

ई-कचऱ्याचा प्रकार आणि त्याचे एकूणात प्रमाण
- संगणकीय साहित्य - 70 टक्के
- दूरसंचार साहित्य - 12 टक्के
- विद्युत साहित्य - 8 टक्के
- वैद्यकीय साहित्य - 7 टक्के
- घरगुती साहित्य - 3 टक्के

ई-कचरा
- संगणक मॉनिटर, कॅथोड रे ट्यूब (सीआरटी), प्रिंटेड सर्किट बोर्ड (पीसीबी)
- मोबाईल फोन, चार्जर
- लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी), प्लास्मा टीव्ही
- वातानुकूलन यंत्रे (एसी), रेफ्रिजरेटर्स

काय काळजी घ्यावी
- घरातील ई-कचरा कोठेही टाकू नका
- अधिकृत पुनर्प्रक्रिया केंद्रालाच ई-कचरा द्या
- अशास्त्रीय पद्धतीने ई-कचरा जाळू नका

ई-कचरा व्यवस्थापनासाठी काय करावे
- ई-कचरा गोळा करणाऱ्या केंद्रांची संख्या वाढविणे, तिथे पोचण्यासाठी अधिक सोयी-सुविधा देणे
- ई-कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या अप्रशिक्षित व्यक्तींना प्रशिक्षण देणे
- बालमजुरी थांबविण्यासाठी नियमावली, कायदे करून त्याची कार्यवाही
- असंघटित क्षेत्राला संघटित करून त्यांना सक्षम करणे

ई-कचऱ्यावर पुनर्प्रक्रियेसाठी वैयक्तिक किंवा घरगुती पातळीपेक्षा औद्योगिक क्षेत्राकडून अधिक मागणी दिसते. पुनर्प्रक्रिया केल्यानंतर उर्वरित भागांची विल्हेवाट लावण्याचा टप्पा खासगी कंपन्यांसाठी खर्चिक ठरतो आहे. सामान्य नागरिकांमध्ये ई-कचऱ्याबद्दल जनजागृती गरजेची आहे.
- मनीष पाटील, सीओओ, हाय-टेक रिसायक्‍लिंग इंडिया, पुणे

‘भंगार व्यावसायिकांकडून सर्वांत धोकादायक आणि अशास्त्रीय पद्धतीने होणाऱ्या ई-कचऱ्याची हाताळणी ही चिंतेची बाब आहे. किरणोत्सर्जक पदार्थांची हाताळणी अशा व्यक्तींकडून अजाणतेपणे होत असल्याचे दिल्लीतील काही उदाहरणांमधून स्पष्ट झाले आहे.‘‘
- डी. एस. रावत, महासचिव, असोचॅम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com