लॉर्ड इज रायझन ! इनडीड, ही इज रायझन... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

पुणे - ‘अबालवृद्ध गाऊगीत, या दिनी उठला खचित, स्वर्गाचा राजा विराजीत, होलेलूया ! होलेलूया !’. ‘जा सांगा मम बंधूंना आलो जिंकूनी या मरणा’ यासारखी भक्तिगीते गाऊन ईस्टर संडे साजरा करण्यात आला. ‘लॉर्ड इज रायझन ! ‘इनडीड, ही इज रायझन.’ ‘प्रभू येशू उठला, खरोखर उठला आहे,’ असे म्हणत ख्रिश्‍चन धर्मीय नागरिकांनी येशूच्या पुनरुत्थान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शहर, उपनगरांतील चर्चतर्फे पहाटे चारनंतर सुवार्ता फेऱ्या काढण्यात आल्या. 

प्रभू येशूचे पुनरुत्थान हा आनंदाचा दिवस म्हणून ख्रिश्‍चन धर्मीयांमध्ये साजरा करण्यात येतो. रोमन कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट पंथीयांच्या चर्चमध्ये रविवारी (ता. १६) पहाटेपासूनच प्रभूच्या स्तुतीपर भक्तिगीतांचे गायन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजिले होते. विशेष उपासनेसाठी जमलेल्या भाविकांना बेखमीरची (मीठ नसलेली) भाकर आणि द्राक्ष रसाचे वाटप करण्यात येत होते. पुनरुत्थान दिवसाला पवित्र दिवस मानण्यात येत असल्याने मुला-मुलींचा बाप्तिस्मा (पवित्र विधी) करण्यात आला.   

शनिवारी (ता. १५) चाळीस दिवसांच्या उपवासाची सांगता झाल्याने ईस्टर संडेला ख्रिश्‍चन धर्मीयांच्या घरोघरी सामिषसह गोडाधोडाच्या भोजनाचे बेत आखण्यात आले होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, मल्याळी, तमीळ, तेलगू भाषक नागरिकांच्या चर्चमध्ये झालेल्या उपासनेत हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शविली. या निमित्ताने व्हॉट्‌सॲप, ट्विटर, फेसबुक वरूनही शुभेच्छा संदेश देण्यात येत होते. 

पुणे धर्मप्रांताचे कोशाध्यक्ष रेव्हरंड अजित फरांदे म्हणाले, ‘‘प्रार्थना, प्रवचन आणि पवित्र सहभागीता विधीसाठी जमलेल्या भाविकांनी उपासनेत सहभाग घेऊन ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या.’’ 

सेंट क्रिस्पीन्स चर्चच्या रेव्हरंड मृदुला बळीद म्हणाल्या, ‘‘आजचा दिवस ख्रिश्‍नच धर्मीयांसाठी आनंदोत्सवाचा असतो. प्रभू येशूची आठवण म्हणून भाकर आणि द्राक्ष रसाचे वाटप होते. गीते गाऊन प्रभूची भक्ती करतो.’’ इमॅन्युअल ए. जी. चर्चचे रेव्हरंड शिरीश सूर्यवंशी म्हणाले, ‘‘प्रामाणिकपणे जीवन जगावे. तसेच निराशेतून आशेच्या दिशेने जगावे, हा प्रभू येशूचा संदेश देण्यात येतो. ’’