शिक्षणाधिकाऱ्यांस अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

पिंपरी - क्रीडा प्रबोधनाच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक आहाराचे बिल पास करून देण्यासाठी सकारात्मक अहवालाकरिता माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांनी २५ हजारांची मागणी केली होती. त्यातील पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) मंगळवारी (ता. २१) सकाळी मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

पिंपरी - क्रीडा प्रबोधनाच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक आहाराचे बिल पास करून देण्यासाठी सकारात्मक अहवालाकरिता माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांनी २५ हजारांची मागणी केली होती. त्यातील पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) मंगळवारी (ता. २१) सकाळी मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

अलका ज्ञानेश्‍वर कांबळे (वय ५२, एचए कॉलनी, पिंपरी) आणि बाबासाहेब अंबादास राठोड (वय ३४, रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. संबंधित तक्रारदाराकडे क्रीडा प्रबोधिनी शाळेसाठी पूरक आहारांतर्गत न्याहारी व दुपारचे जेवण पुरवण्याचा ठेका होता. न्याहारी व जेवण चांगल्या प्रतीचे असल्याचा अहवाल देण्यासाठी त्यांच्याकडे प्रबोधिनीचे मुख्याध्यापक राठोड याने पाच हजारांची मागणी केली होती. तसेच, महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कांबळे यांनी बिल काढण्यासाठी २० हजारांची मागणी केली होती. त्यानुसार एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १४ मार्च रोजी आरोपींनी लाचेची मागणी केली आहे काय याबाबत पंच पाठवून खात्री केली होती. कांबळे यांनी आपल्या वाट्याचे पैसे मुख्याध्यापकांकडे देण्यास सांगितले. त्यानंतर मंगळवारी (ता. २१) क्रीडा प्रबोधिनीच्या परिसरात तक्रारदाराकडून पाच हजारांची रोकड घेताना राठोड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक राजू चव्हाण, चंद्रकांत चौधरी, पोलिस हवालदार सुनील शेळके, चिमटे, काटले व महिला कर्मचारी गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सरकारी पंच झाला आरोपी
पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका आरोपीवर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये मुख्याध्यापक राठोड हा सरकारी पंच आहे. मात्र आता तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत आरोपी झाला आहे. 

ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून १४ मार्च रोजी खातरजमा करण्यात आली. मंगळवारी पैसे घेताना आरोपीला अटक करण्यात आली. शासकीय किंवा निमशासकीय, तसेच कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास घाबरून न जाता १०६४ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क करावा.
- राजू चव्हाण, निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Web Title: education officer arrested