‘सकाळ’ देणार ‘प्रभावी नगरसेवक पुरस्कार’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

पुणे - चांगले काम करणाऱ्या नगरसेवकांचा विशेष गौरव करण्याचे ‘सकाळ’ने ठरवले आहे; त्यासाठी ‘प्रभावी नगरसवेक’ आणि ‘उत्कृष्ट प्रभाग’ या पुरस्कारांची घोषणा पुण्यात झालेल्या नगरसेवकांच्या मेळाव्यात करण्यात आली. राज्यातील महापालिका क्षेत्रांसाठी महानगर स्तरांवर हे पुरस्कार दिले जातील. या पुरस्कारांचे निकष लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. 

पुणे - चांगले काम करणाऱ्या नगरसेवकांचा विशेष गौरव करण्याचे ‘सकाळ’ने ठरवले आहे; त्यासाठी ‘प्रभावी नगरसवेक’ आणि ‘उत्कृष्ट प्रभाग’ या पुरस्कारांची घोषणा पुण्यात झालेल्या नगरसेवकांच्या मेळाव्यात करण्यात आली. राज्यातील महापालिका क्षेत्रांसाठी महानगर स्तरांवर हे पुरस्कार दिले जातील. या पुरस्कारांचे निकष लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. 

नव्या दमाचे नवे नगरसेवक... शहराला विकासाची नवी पहाट दाखविण्याचे त्यांचं स्वप्न... जुन्या नगरसेवकांच्या अनुभवाची शिदोरी... शहर आणि प्रभागांचा चेहरामोहरा बदलण्याची इच्छा... त्या कल्पनांना साकार करण्यासाठी ‘सकाळ’चं पाठबळ... अशा स्फूर्तिदायक वातावरणात पुण्याच्या नगरसेवकांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. 

महापालिका निवडणुकीत विजयी पताका घेऊन महापालिकेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांना एकत्र आणून शहराच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं स्नेहमेळाव्याचं आयोजन ‘सकाळ’ने केलं होतं. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे यांसह सुमारे १३०हून अधिक नगरसेवकांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. 

नवनिर्वाचितांमध्ये बहुतांशजण हे पहिल्यांदाच नगरसेवक झाले आहेत. त्यांना महापालिकेची कार्यप्रणाली समजावी, देश-विदेशांतील शहरांमध्ये झालेले स्मार्ट बदल, त्यासाठी तेथील नगरसेवकांची ठरलेली महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने माजी सनदी अधिकारी रमानाथ झा यांचे व्याख्यान या वेळी झाले. 

‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार, संपादक मल्हार अरणकल्ले, कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांच्या हस्ते मुक्ता टिळक, नवनाथ कांबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरली मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते वसंत मोरे, रिपब्लिकन पक्षाचे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा सत्कार करण्यात आला. नव्याने महापालिकेत पाऊल ठेवणारे आणि पुन्हा निवडून आलेले जुने नगरसेवक यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘पुण्याचे शिल्पकार’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये अरणकल्ले यांनी ‘‘ज्यांना बदल घडवून आणायचे आहेत, त्यांच्यासाठी ‘सकाळ’चे व्यासपीठ खुले आहे,’’ असे स्पष्ट केले. सुतार यांनी प्रभावी नगरसेवक आणि उत्कृष्ट प्रभाग पुरस्काराविषयी विवेचन केले; तर सहयोगी संपादक सुनील माळी यांनी  सूत्रसंचालन केले.

शहर विकासात ‘सकाळ’ महत्त्वाचा - महापौर
महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘गेली ८५ वर्षे ‘सकाळ’ने लोकसहभागाला महत्त्व दिले आहे. बस डे, तनिष्का, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या उपक्रमात लोकांना बरोबर घेऊन बदलाचे उद्दिष्ट साध्य केले. पुणे शहराच्या विकासाच्या प्रक्रियेतही ‘सकाळ’चे महत्त्व कायम राहणार आहे. एक मार्गदर्शक म्हणून या वृत्तपत्राचा उपयोग आपल्याला होईल. आपल्याला केवळ हारतुरे घेणारे लोकप्रतिनिधी व्हायचे नाही. लोकांचे प्रश्‍न लोकांमध्ये जाऊन सोडवायचे आहेत. कचऱ्याची समस्या लोकांबरोबर चर्चा करून आणि वाहतूकव्यवस्था पोलिसांच्या सहकार्याने कशी करता येईल, याचा विचार प्रत्येकाने करावा लागेल. परकी गुंतवणूकदारांना पुणे आकर्षित करीत आहे. त्याचा फायदा महापालिकेने का करून घेऊ नये? त्यासाठी शहराची बलस्थाने, कमतरता आणि संधी याचा विचार करावा लागेल. बलस्थाने वाढवून संभाव्य धोके कमी करणे आणि संधी आपल्याला शोधाव्या लागतील.’’

‘चांगल्या कामाला पुरस्कार’
स्नेहमेळावा आयोजित करण्यामागील ‘सकाळ’ची भूमिका श्रीराम पवार यांनी विशद केली. ते म्हणाले, ‘‘‘सकाळ’ वृत्तपत्र परिवर्तनासाठी आहे. लोकांच्या जगण्यामध्ये बदल घडावा, त्यांचे राहणीमान उंचावे; तसेच जनतेला सकारात्मक सक्रियतेशी जोडावे, अशी आमची भूमिका आहे. पुण्याचे नगरसेवक आणि जनतेच्या सहकार्यानेच ‘सकाळ’ने येथे ‘बस डे’ साजरा करून वाहतूकसमस्येवर उपाय आहे हे दाखवून दिले. म्हणूनच आपल्या सहकार्यातून पुणे उत्कृष्ट शहर बनावे, हाच ‘सकाळ’चा प्रयत्न आहे.’’ ‘‘जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतात. नव्याने नगरसेवक झाल्यानंतरही नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील. त्यासाठी ‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’ आपणास प्रशिक्षण देण्यास तयार आहे. स्मार्ट सिटीसाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये काम करणाऱ्या ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चीही मदत तुम्हाला घेता येईल,’’ असे पवार यांनी सांगितले. 

Web Title: Effective Corporator Award