नवख्या उमेदवाराची ज्येष्ठांवर मात

मंगेश कोळपकर - @MkolapkarSakal
गुरुवार, 2 मार्च 2017

उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, विद्यमान नगरसेवक, असे ज्येष्ठ उमेदवार रिंगणात असतानाही नवख्या उमेदवाराने विजय साकारण्याची अनपेक्षित घटना डेक्कन जिमखाना- मॉडेल कॉलनीत (प्रभाग १४) घडली. नियोजनबद्ध प्रचाराच्या बळावर या प्रभागातील चारही जागांवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व राखले आहे.

उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, विद्यमान नगरसेवक, असे ज्येष्ठ उमेदवार रिंगणात असतानाही नवख्या उमेदवाराने विजय साकारण्याची अनपेक्षित घटना डेक्कन जिमखाना- मॉडेल कॉलनीत (प्रभाग १४) घडली. नियोजनबद्ध प्रचाराच्या बळावर या प्रभागातील चारही जागांवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व राखले आहे.

शहरातील लक्षवेधी लढतींपैकी ही एक लढत होती. कोणत्याही नेत्यांची प्रचारसभा न होता किंवा पदयात्रेत राष्ट्रीय, राज्यस्तरीय नेते न येताही उमेदवारांनी पक्षसंघटनेतील कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक जिंकली. तीन विद्यमान नगरसेवक या लढतीत पराभूत झाले. या प्रभागात भाजपच्या स्वाती लोखंडे अ गटात, नीलिमा खाडे ब गटात, प्रा. ज्योत्स्ना एकबोटे क गटात, तर सिद्धार्थ शिरोळे ड गटातून विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुक्रमे प्रशांत सावंत, मंगला पवार, हेमलता महाले, बाळासाहेब बोडके; काँग्रेसचे नारायण पाटोळे, मयूरी शिंदे, आयशा सय्यद, मुकारी अलगुडे; शिवसेनेकडून अरविंद कांबळे, नीता मंजाळकर, अमिता शिरोळे, राजू पवार, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजेश नायडू, सोनम कुसाळकर, विनया दळवी, चैतन्य दीक्षित हे निवडणूक रिंगणात होते. 

सर्वाधिक चुरस ड गटात होती. स्थायीचे विद्यमान अध्यक्ष बोडके, उपमहापौर अलगुडे, नगरसेवक पवार हे या गटात होते आणि त्यांच्यासमोर खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांचे आव्हान होते. शिरोळे यांच्या उमेदवारीला सुरवातीला पक्षांतर्गत काही घटकांचा विरोध होता. त्यांची नाराजी लक्षात घेता ही निवडणूक चुरशीची होईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात घडले उलटेच. 

शिवाजीनगर गावठाण, तोफखाना, पांडवनगर, हनुमाननगर, रामोशीवाडी, शिवाजीनगर पोलिस वसाहत, खैरेवाडी, पुणे विद्यापीठ रस्ता आदी भागांवर बोडके, अलगुडे आणि राजू पवार यांची भिस्त होती. तर मॉडेल कॉलनी, सेनापती बापट रस्ता, आपटे रस्ता, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, डेक्कन जिमखाना, रेव्हेन्यू कॉलनी आदी सुशिक्षित मतदारांचा भरणा असलेल्या भागावर शिरोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भिस्त होती. सुमारे ८२ हजार मतदार या प्रभागात होते. 

या प्रभागातील त्या त्या भागात बोडके, अलगुडे, राजू पवार यांना मते मिळाली, तर शिरोळे यांना सर्वच भागात कमी अधिक फरकाने मते मिळाली. त्यामुळे एकूण मतदानात ते आघाडीवर राहिले. 

एकबोटे या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे प्रभागात त्या परिचित होत्या. त्यांचे दीर मिलिंद एकबोटे यांचाही जनसंपर्क त्यांना उपयुक्त ठरला. खाडे विद्यमान नगरसेवक असल्यामुळे त्यांना अडचण आली नाही. तर लोखंडे यांना सामाजिक चळवळीतील संपर्क उपयुक्त ठरला. विरोधी पक्षात तुल्यबळ उमेदवार असले, तरी भाजपने एकत्रित प्रचारावर अखेरपर्यंत भर दिला. त्यामुळे पक्षांतर्गत आणि बाहेरच्या विरोधकांवर मताधिक्‍याने 
मात करता आली. 

अलगुडे, बोडके, पवार यांनी नगरसेवक असताना त्यांच्या त्यांच्या प्रभागात विकास कामे केली होती. परंतु प्रभागाचा विस्तार, मतदारांची वाढलेली संख्या लक्षात घेता त्यांचे पॅनेल मजबूत झाले नाही. तुलनेने भाजपच्या सुप्त लाटेमुळे एकहाती कमळ निवडून आले.

Web Title: The elderly overcome potential candidate