मताधिक्‍य देणार... पण कोणाला?

रामदास जगताप
शुक्रवार, 24 मार्च 2017

ऐकलंत का? 

निवडणूक म्हटले, की आरोप- प्रत्यारोप आलेच; पण एखाद्या आरोपाचे किंवा राजकीय वाक्‍याचे खंडन व्यवस्थित झाले नाही, तर निवडणुकीनंतरही त्याचे राजकीय भांडवल होऊ शकते. 

निवडणूक म्हटले, की आरोप- प्रत्यारोप आलेच; पण एखाद्या आरोपाचे किंवा राजकीय वाक्‍याचे खंडन व्यवस्थित झाले नाही, तर निवडणुकीनंतरही त्याचे राजकीय भांडवल होऊ शकते. 

जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच झाली. प्रचारादरम्यान उमेदवारांच्या समर्थकांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक झाली. बारामती तालुक्‍यातील सांगवी- डोर्लेवाडी गटात तर आश्‍चर्यकारक निकाल लागेल, असे चित्र निर्माण झाले होते. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रचारप्रमुख निवडणूक काळात, "येऊन येऊन येणार कोण...? आमच्याशिवाय हायेच कोण...?' असे म्हणत गुलाल आमचाच, असा विश्वास व्यक्त करत होते.

नीरावागजमध्ये झालेल्या भाजपच्या सभेत तर याच गावातील एका ज्येष्ठ नेत्याने छातीठोकपणे सांगितले, की आमच्या गावात नेत्यांच्या मागे जनता नाय म्हणूनच तर विजय आमचा हाय... मी छातीठोकपणे सांगतोय, आमच्या गावातून एक हजारपेक्षा जास्त मताधिक्‍य दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाय. अशा भाषणांची जुगलबंदी प्रचारादरम्यान सातत्याने दोन्ही पक्षांकडून ऐकायला मिळत होती. 

या गटातून राष्ट्रवादीच्या मीनाक्षी किरण तावरे यांचा सहा हजारांहून अधिक मतांनी विजय झाला. त्यानंतर काही दिवसांतच भाजपकडून सभा गाजवणारे ज्येष्ठ वक्ते आणि जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे यांचे पती किरण तावरे यांची एका कार्यक्रमात भेट झाली. ज्येष्ठ नेत्यांनी किरण तावरे यांचे पत्नीच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. 
तावरे त्यांना म्हणाले, "तुमचेही मनापासून अभिनंदन, कारण या निवडणुकीत तुम्ही जसे बोललात तसेच करून दाखविले.'' 
"तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे,'' असा प्रश्न ज्येष्ठ नेत्याने विचारल्यानंतर तावरे म्हणाले, "अहो, नीरावागज गावात तुम्हीच म्हणाला होतात, की आम्ही नीरावागजमधून एक हजाराचे मताधिक्‍य देऊ; पण हे मताधिक्‍य नेमके कुणाला देणार हे तुम्ही सांगितलेच नाही. त्यामुळे येथील जनतेने आम्हाला म्हणजेच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला एक हजाराचे मताधिक्‍य दिले.'' या वाक्‍याने निवडणूक प्रचारात रंगलेली जुगलबंदी अखेर हास्यमय झाली. 

Web Title: election comedy: promise to vote, but to whom?