वीजमीटरचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

ग्राहक वैतागले; कंपनीकडूनच पुरवठा नाही

पुणे - महावितरणकडून मागेल त्याला वीज, असे आश्‍वासन नेहमीच दिले जाते; पण अर्ज करूनही सिंगल आणि थ्री फेज वीजमीटरचा पुरवठा ग्राहकांना होत नाही. त्यामुळे नवीन कनेक्‍शन मिळू न शकल्याने बहुतांश ग्राहक वैतागले आहेत. मागील दोन-तीन महिन्यांपासून पुणे परिमंडल अंतर्गत सुमारे १५,०१७ ग्राहकांनी मीटरसाठी अर्ज केले आहेत. त्यातील नऊ हजारपेक्षा अधिक ग्राहकांना मीटरचा पुरवठा झालेला नाही.  

पुणे परिमंडल अंतर्गत भोसरी, पिंपरी, विश्रांतवाडी येथील बहुतांश ग्राहकांनी महावितरणकडे तक्रार केल्या आहेत. मागील आठवड्यात महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांची इलेक्‍ट्रिकल कॉन्ट्रॅक्‍टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (पुणे विभाग) पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या बैठकीदरम्यान मीटरचा तुटवडा याबाबत तक्रारी मांडण्यात आल्या. पुणे, बारामती, कोल्हापूर येथेही मीटरचा तुटवडा असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. घरगुती आणि दुकानांकरिता सिंगल आणि थ्री फेज मीटर लागतात. तर औद्योगिक क्षेत्राकरिता प्रामुख्याने थ्री फेज मीटर वापरतात. 

उन्हाळा सुरू झाला तरीही ग्राहकांना मागणीनुसार मीटर मिळालेले नाहीत. उन्हाळ्यात अनेक नागरिक त्यांच्या घरी किंवा दुकानांमध्ये वातानुकुलीन यंत्रणा बसवितात. म्हणूनच गरजेनुसार सिंगल किंवा थ्री फेज मीटरची मागणी ग्राहकांकडून होते. दर महिन्याला महावितरणकडून पुणे परिमंडल अंतर्गत पंचवीस हजार मीटर बसविण्यात येतात. खराब झालेले मीटरही बदलून देण्यात येतात. तरीही ग्राहकांच्या मागणीनुसार वेळेत मीटरचा पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे ग्राहक नाराजी व्यक्त 
करीत आहेत. 

उत्पादकांकडून महावितरणला प्रत्येक महिन्याला पंचवीस हजार नवीन मीटरचा पुरवठा होतो. काही वेळेस पुरवठ्यात अनियमितताही येते. मागील तीन महिन्यांमध्ये १५,०१७ ग्राहकांनी अर्ज केले आहेत. नवीन केबल टाकणे, रोहित्र बसविणे यांसारखी अन्य कामे होणे बाकी आहे, असे पाच हजारांच्या आसपास ग्राहक आहेत. तर उर्वरित ९३९५ ग्राहकांना या महिन्यामध्ये मीटर देण्यात येईल. लवकरच सोळा हजार नवीन मीटर पुणे परिमंडलला मिळणार आहेत.
- रामराव मुंडे, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल

गरजेनुसार सिंगल किंवा थ्री फेज मीटरची मागणी
नऊ हजारपेक्षा अधिक ग्राहकांना मीटरची प्रतीक्षा

Web Title: electricity meter shortage