अमली पदार्थ विक्रीविरोधात तरुणाईचाच एल्गार! 

 youth Elgar against drug sales!
youth Elgar against drug sales!

महाविद्यालयांमध्ये होणार "व्हॉट्‌सऍप ग्रुप'; अमली पदार्थविरोधी विभागाचा पुढाकार 

पुणे :  महाविद्यालयाच्या आवारात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात आता तरुणाईच आवाज उठवणार आहे. अमली पदार्थांची तस्करी थांबविण्यासाठी "अमली पदार्थविरोधी विभागा'तर्फे शहरातील सुमारे 350 महाविद्यालयांत तरुण-तरुणींचे "व्हॉट्‌सऍप ग्रुप' तयार करण्यात येत असून, या ग्रुपच्या माध्यमातून तरुण अमली पदार्थांच्या विक्रीची माहिती थेट विभागाला कळविणार आहेत. यातून आता अशा लोकांवर थेट नजर ठेवता येणार आहे. 


प्रत्येक महाविद्यालयातील दोन विद्यार्थी या व्हॉट्‌सऍप ग्रुपमध्ये असणार आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून ते महाविद्यालयाच्या आवारात आणि बाहेर होणाऱ्या अमली पदार्थांच्या विक्रीची माहिती ग्रुपवर असलेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट देणार आहेत. तसेच, तरुणांमध्ये व्यसनमुक्तीचा जागर व्हावा, यासाठीही विभागाकडून हे ग्रुप तयार केले जात आहेत, अशी माहिती अमली पदार्थविरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी "सकाळ'ला दिली. पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्या आदेशानुसार हे ग्रुप तयार केले आहेत. एक जानेवारीपासून या उपक्रमांतर्गत तरुण-तरुणी प्रत्यक्ष कामाला सुरवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
या उपक्रमात "आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रा'चे सहकार्य मिळत आहे. या उपक्रमांतर्गत केंद्राने फर्ग्युसन, मॉडर्न आणि मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयातील सुमारे एक हजार तरुणांचा "आनंदवन यंगस्टर्स' हा ग्रुप तयार केला आहे. यात विभागातील अधिकारीही असून, ई-ऍडिक्‍शन आणि व्यसनाधिनतेवर तरुणांमध्ये जागर करण्याचा प्रयत्न होत आहे. आतापर्यंत व्हॉट्‌सऍपचे 75 ग्रुप तयार झाले असून, येत्या काही दिवसांमध्ये 250 ते 300 ग्रुप तयार केले जातील. अमली पदार्थांच्या विक्रीपासून तसेच व्यसनापासून तरुणाईला परावृत्त करण्यासाठी हे ग्रुप तयार करण्यात येत आहेत. 

""सध्या तरुणांमध्ये ई-ऍडिक्‍शनचे प्रमाण वाढत आहे. तरुणाई इंटरनेट आणि मोबाईलच्या आहारी गेली आहे. याच तरुणाईला ई-ऍडिक्‍शनपासून परावृत्त करण्यासाठी या व्हॉट्‌सऍप ग्रुपद्वारे जनजागर करण्यात येत आहे. ई-ऍडिक्‍शनचे दुष्परिणाम आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग याविषयीची माहिती या ग्रुपवर अपलोड केली जाणार आहे. या माध्यमातून ई-ऍडिक्‍शन थांबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थीही यात सहभागी होणार आहेत. 
- डॉ. अजय दुधाणे, अध्यक्ष, आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र 

""अमली पदार्थांपासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी तरुणांनीच एकत्र येऊन असे प्रकार थांबवावेत आणि आपल्यासारख्या तरुणांमध्ये व्यसनाधिनतेविषयी जनजागृती करावी, यासाठी हे ग्रुप तयार केले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविद्यालयात कोणत्याही मार्गाने अमली पदार्थ जाऊ नयेत यावर तरुणच नजर ठेवणार आहेत. या उपक्रमाला आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचे सहकार्य मिळाले आहे.'' 
- प्रतिभा जोशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमली पदार्थविरोधी विभाग 

""तरुणाईला व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून एकत्र आणण्याची ही कल्पना चांगली आहे. अमली पदार्थांविरुद्ध आता तरुणच आवाज उठवणार असल्यामुळे आपोआप तरुणांमध्ये व्यसनाधिनतेचे जागर होईल. आमच्या महाविद्यालयाचा या उपक्रमाला पाठिंबा आहे.'' 
- डॉ. एम. डी. लॉरेन्स, प्राचार्य, मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com