महापालिकेच्या भूखंडावर विकसकाचे अतिक्रमण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

पुणे - महापालिकेच्या ताब्यात गेल्या 42 वर्षांपासून असलेला मित्र मंडळ चौकातील सुमारे नऊ एकराचा भूखंड एका खासगी विकसकाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्याने संबंधित भूखंडावर कुंपण घातले आहे. कुंपण बेकायदा असून संबंधित विकसकाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने शुक्रवारी घेतला. मात्र, पालिकेच्याच एका विभागाने कुंपण काढण्याच्या आदेशाकडे काणाडोळा केल्याचेही समजते. 

पुणे - महापालिकेच्या ताब्यात गेल्या 42 वर्षांपासून असलेला मित्र मंडळ चौकातील सुमारे नऊ एकराचा भूखंड एका खासगी विकसकाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्याने संबंधित भूखंडावर कुंपण घातले आहे. कुंपण बेकायदा असून संबंधित विकसकाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने शुक्रवारी घेतला. मात्र, पालिकेच्याच एका विभागाने कुंपण काढण्याच्या आदेशाकडे काणाडोळा केल्याचेही समजते. 

मित्र मंडळ चौकातील संबंधित नऊ एकराचा भूखंड कमाल नागरी जमीन धारणा कायद्यांतर्गत (यूएलसी) 22 फेब्रुवारी 1979 रोजी पालिकेच्या ताब्यात आला. पालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि परिचारिका महाविद्यालयाचे त्यावर आरक्षण आहे. हा भूखंड ताब्यात घेण्यासाठीचे शुल्कही पालिकेने राज्य सरकारकडे भरले आहे. एका विकसकाने याबाबत सत्र, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला; परंतु तिन्ही ठिकाणी पालिकेच्या बाजूने निकाल लागला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याबाबत संबंधित विकसकाचे म्हणणे ऐकून अंतिम निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. त्याबाबतचा दावाही पालिका जिंकली आहे. मात्र, विकसकाने त्याबाबत उच्च न्यायालयात दाद मागितली असून त्याची सुनावणी प्रलंबित आहे. 

भूखंडाबाबत न्यायालयात दावा दाखल असताना, संबंधित विकसकाने त्यावर कुंपण घातले आहे. त्याची माहिती मिळाल्यावर भूमी जिंदगी विभागाने ते तातडीने काढून टाकण्याचा आदेश पालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाला दिला. दरम्यान, संबंधित विकसकाने त्या भूखंडावर इमारतींचा आराखडा मंजूर करावा, यासाठी अर्ज केला. त्याची माहिती मिळाल्यावर आराखडा मंजूर करू नये, असेही भूमी जिंदगी विभागाने कळविले; तसेच याबाबत फौजदारी कारवाई करता येईल का, अशी विधी विभागाकडे विचारणा केली. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे गुन्हा दाखल करण्याऐवजी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याची याचिका दाखल करावी, असा निर्णय विधी विभागाने दिला. त्यामुळे पालिकेने अवमान झाल्याची याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भूखंड पालिकेच्याच मालकीचा असून त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये, अशी जाहीर नोटीस पालिका प्रसिद्ध करणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले. 

महापालिकेच्या मालमत्तेचे रक्षण करा 
सुमारे नऊ एकराचा हा भूखंड एक विकसक गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत असून, महापालिकेतील काही घटक त्याला साथ देत असल्याचा आरोप सुभाष जगताप यांनी केला आहे; तर पालिकेच्या ताब्यातील भूखंडावरील कुंपण काढण्यासाठी आबा बागुल यांनी तक्रार केली आहे. या भूखंडावर वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशीही मागणी त्यांनी केली. आयुक्तांनी आता तरी डोळे उघडून महापालिकेच्या मालमत्तांचे संरक्षण करावे, अशी मागणी बागुल आणि जगताप यांनी केली आहे. 

Web Title: Encroachment of developer on municipal plot