...तर विधानसभेची निवडणूक लढविणार नाही: राहुल कुल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

आमदार राहुल कुल म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाला दरवर्षी सुमारे 50 कोटी रूपयांचा निधी यायचा तो आता 500 कोटी रूपये आला. या विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने टेंडर उशीरा निघत आहे. अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची विनंती आपण संबंधित विभागाला केली आहे. 2017-18 च्या अंदाजपत्रकात रस्त्यांसाठी जिल्ह्यात सर्वात जास्त निधी दौंडला मिळाला आहे.

केडगाव : "दौंड शहराला जोडणा-या चार प्रमुख रस्त्यांसह तालुक्यातील मी जाहिर केलेल्या सर्व रस्त्यांची कामे येत्या वर्षभरात सुरू झाली नाही तर विधानसभेची निवडणूक लढविणार नाही", असे खळबळजनक व्यक्तव्य आमदार राहुल कुल यांनी केले आहे. विकासकामांची वस्तूस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी आपली आमदारकी पणाला लावल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.        
   
भीमा पाटस कारखान्याच्या बॅायलर प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना कुल म्हणाले, आधीच्या सर्व आमदारांपेक्षा माझ्या कार्याकालातील निधी हा सर्वाधिक असेल. मी 900 कोटी रूपयांची विकासकामे वर्तमानपत्रातून जाहिर केली आहे. यातील एकही काम आश्वासन म्हणून दिलेले नाही. 900 कोटीतील सर्व कामांना प्रशासकीय मान्यता आहे, बहुतांश कामांसाठी अंदाजपत्रकात तरतूद झालेली आहे, काहींची टेंडर होऊन वर्क ऑर्डरही निघाल्या आहेत. पावसामुळे कामे सुरू करता आली नाहीत. यातील एकही काम राहणार नाही. भीमा पाटस चालू होत असल्याने विरोधकांकडे आता मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी आता 900 कोटींच्या विकासकामाला लक्ष्य केले आहे. 

कुल म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाला दरवर्षी सुमारे 50 कोटी रूपयांचा निधी यायचा तो आता 500 कोटी रूपये आला. या विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने टेंडर उशीरा निघत आहे. अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची विनंती आपण संबंधित विभागाला केली आहे. 2017-18 च्या अंदाजपत्रकात रस्त्यांसाठी जिल्ह्यात सर्वात जास्त निधी दौंडला मिळाला आहे.  बेटपाटी-देऊळगावगाडा-खोर-भांडगाव आणि पारगाव-गलांडवाडी-खुटबाव-भांडगाव हे दोन रस्ते नव्याने होणार आहेत. राजेगाव - भिगवण रस्त्याचे टेंडर झाले आहे. पाटस-दौंड रस्त्याचे डांबरीकरण माजी आमदार रंजना कुल यांच्या काळात झाले. त्यानंतर या रस्त्यावर निधीच पडला नव्हता. आता हा रस्ता 'अष्टविनायक'मधून होत आहे.  
                                              
खड्डे काय फक्त दौंडमध्येच आहे का?
यंदा दौंडसह राज्यात मोठया प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते दुरूस्तीची टेंडर मंजूर होऊनही पावसामुळे कामे सुरू करता आली नाही. खडडे हा आता राज्याच्या विषय झाला आहे. खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे परंतु दौंडमधील सर्वच प्रमुख रस्ते नवीन करण्याचे माझे नियोजन झाले आहे. असे कुल यांनी म्हटले आहे.