पुणे- अजित पवारांनी भुमीपुजन केलेल्या पाण्याच्या टाकीचे पुन्हा भुमीपुजन; भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने

अन्वर मोमीन
शनिवार, 22 जुलै 2017

खराडीतील बोराटेनगरमधील पाण्याच्या टाकीचे भुमिपुजन होणार आणि त्यासाठी उद्घाटनाची कोनशीला काढण्यात आली आहे हे समजल्यानंतर शुक्रवारी (ता. 21) स्थानिक नगरसेवक महेंद्र पठारे व अॅड. भैयासाहेब जाधव यांनी सरळ पालिका आयुक्तांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

वडगाव शेरी- खराडीतील ज्या पाण्याच्या टाकीचे भुमिपुजन वर्षभरापुर्वी अजीत पवार यांनी केले त्याच पाण्याच्या टाकीचे भुमिपुजन आज पुन्हा भाजपचे आमदार व नगरसेवकांनी महापौरांच्या हस्ते घडवून आणले. यावेळी अजीत पवारांच्या नावाची कोनशीला काढल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आक्रमक होत कार्यक्रम स्थळीच महपौरांना याचा जाब विचारला. त्यावर महापौरांनी हा विषयच माहित नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले व चौकशी करते एवढेच उत्तर दिले. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना ताब्यात घेतल्यानंतर महापौरांच्या हस्ते भुमिपुजन उरकण्यात आले.
   
खराडीतील बोराटेनगरमधील पाण्याच्या टाकीचे भुमिपुजन होणार आणि त्यासाठी उद्घाटनाची कोनशीला काढण्यात आली आहे हे समजल्यानंतर शुक्रवारी (ता. 21) स्थानिक नगरसेवक महेंद्र पठारे व अॅड. भैयासाहेब जाधव यांनी सरळ पालिका आयुक्तांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आज खराडीत भुमिपुजन होते की नाही याविषयी शंका व्यक्त केली जात होती. वाद होऊ नये यासाठी सकाळपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त या परिसरात ठेवण्यात होता. भाजपने रात्रीतून संपुर्ण खराडीत कार्यक्रमाविषयी फ्लेक्सबाजी केल्याने वादाला आणखी हवा मिळाली.
 
आज दुपारी महापौर मुक्ता टिळक, आमदार जगदीश मुळीक व भाजपचे वडगाव शेरीतील नगरसेवक खराडीत आले. त्यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार बापु पठारे, स्थानिक नगरसेवक महेंद्र पठारे, संजीला पठारे, अॅड. भैयासाहेब जाधव, सुमन पठारे यांनी महापौरांना घेरावा घालून हा कार्यक्रमच बेकायदा असल्याचे सांगितले. त्यावर महापौरांनी चौकशी करते असे मोघम उत्तर दिले. त्यानंतर संजिला पठारे व सुमन पठारे यांनी पुढे जाऊन महापौरांना झालेल्या कार्यक्रमाचे तुम्ही पुन्हा का उद्घाटन करता? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर न देता महापौर पुढे गेल्या. 

यावेळी महेद्र पठारे व जगदीश मुळीक यांची अगदी एकेरी भाषेत शाब्दीक चकमक झाली.  हा सत्तेचा माज आहे असे म्हणत आमदार मुळीक यांनी पाण्याच्या टाकीसाठी अगोदर स्वतःचा निधी टाकावा व नंतर उद्घाटन करावे असे महेंद्र पठारे म्हणाले.  त्यावर प्रतिउत्तरदाखल मुळीक म्हणाले, हे विकास काम आहे. त्याला विऱोध करू नका. कोनशीला चोरीला गेली असेल तर त्यासाठी पोलिसात तक्रार देण्यास मी येतो. दरम्यान महेंद्र पठारे यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भाजपच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

वाद वाढू लागल्याने पोलिसांनी राष्ट्रवादीच्या भैयासाहेब जाधव व महेंद्र पठारे यांना ताब्यात घेतले व कार्यक्रमस्थळापासून दूर नेले. त्यानंतर महापौरांनी व आमदारांनी भुमिपुजनाचा नारळ फोडला. महापौरांनी माजी आमदार बापू पठारे यांनाही नारळ फोडण्याची विनंती केली. स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता त्यांना कार्यक्रमापासून दूर ठेवणे हां चुकीचा पायंडा असल्याचे सांगत बापु पठारे यांनीही नारळ फोडला.