अनधिकृत स्टॉलवर कारवाईसाठी महापालिकेतर्फे चार पथके स्थापन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

पुणे - गणेशोत्सवात शहराच्या मध्य भागात थाटल्या जाणाऱ्या अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने चार पथकांची स्थापना केली असून पोलिसांच्या मदतीने त्यावर कारवाई होणार आहे. 

पुणे - गणेशोत्सवात शहराच्या मध्य भागात थाटल्या जाणाऱ्या अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने चार पथकांची स्थापना केली असून पोलिसांच्या मदतीने त्यावर कारवाई होणार आहे. 

गणेशोत्सवात विशेषतः शहराच्या मध्य भागात सायंकाळी खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू आदींचे स्टॉल उभे राहतात. खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर घरगुती वापराच्या सिलिंडरचाही वापर केला जातो. गेल्या वर्षी शनिवारवाड्याजवळ एका खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर सिलिंडरमधून गळती झालेल्या गॅसमुळे आग लागली होती. या पार्श्‍वभूमीवर अनुचित घटना टाळण्यासाठी चार स्वतंत्र पथकांद्वारे शहराच्या सर्व भागात कारवाई करणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुख संध्या गागरे यांनी दिली. अतिक्रमणांवर कारवाईसाठी दोन पोलिस निरीक्षक, सहा फौजदार आणि 40 पोलिस
कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. याबाबत मंगळवारी होणाऱ्या बैठकीत कारवाईचे स्वरूप निश्‍चित होणार असून सायंकाळपासून कारवाईला प्रारंभ होईल. पहिल्या टप्प्यात विशेषतः गर्दीच्या रस्त्यांवर पादचारी आणि वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या स्टॉलवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
 

गणेशोत्सवाच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल लावण्यासाठी त्या-त्या भागातील क्षेत्रीय कार्यालयात परवानगी दिली जाते. त्यामुळे स्टॉल लावण्यास इच्छुक असणाऱ्या व्यावसायिकांनी परवानगी घेऊनच व्यवसाय करावा, असे आवाहन गागरे यांनी केले आहे.