कर्जमाफीसाठी तृतीयपंथी सरसावले!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिणार एक हजार पत्रं 

पुणे - आमचे प्रश्‍न तुम्ही सोडवू शकत नाही; किमान बळिराजाचे प्रश्‍न तरी सोडवा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या व शेतमालाला हमीभाव द्या, अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली आहे. समाजाकडून जरी उपेक्षा आमच्या वाट्याला येत असली, तरी समाजहितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही एक हजार पत्रं पाठविणार आहोत, असे अंबिका, चांदणी व सुधा या तृतीयपंथीयांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा व त्यांना कर्जमुक्ती द्या, या मागण्यांसाठी विविध संघटना व राजकीय पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. यात आता तृतीयपंथीयदेखील मागे राहिले नाहीत. सुखसागरनगर भागातील सामाजिक कार्यकर्त्या मोनाली व्हावळ यांच्या सहकार्याने या तृतीयपंथीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक हजाराहून अधिक पत्रं पाठविण्याचा निर्धार केला आहे. सध्या पाचशेहून अधिक पत्रं लिहून झाली आहेत. तृतीयपंथीयांनी स्वतःच्या हस्ताक्षरात मराठी आणि इंग्रजी भाषेत पत्रं लिहिली असून, तुम्ही आमचे प्रश्‍न सोडवू शकले नाहीत; पण शेतकऱ्यांचे प्रश्‍न तरी सोडवा, असे नमूद करण्यात आले आहे. 

‘‘शेतकऱ्याच्या प्रश्‍नांचे राजकारणच केले जात आहे, तो कर्जमुक्त झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. तो सक्षम झाला पाहिजे, यात दुमत नाही; पण आजच्या संकटातून त्याला सावरण्याची खरी गरज आहे,’’ असे अंबिका गॅबरेलने सांगितले. चांदणी गोरे म्हणाल्या, ‘‘शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सखोल अभ्यास करूनच मार्ग काढला पाहिजे. आम्हीदेखील शेतकऱ्यांच्या बाजूने असून सरकारला दखल घ्यावीच लागेल. सरकारने दखल घेतली नाही, तर सनदशीरमार्गाने आमचा लढा सुरूच राहील.’’ समाज आम्हाला स्वीकारत नाही, अनेक तृतीयपंथीय हे उच्चशिक्षित असूनही त्यांना नोकरी मिळत नाही. अशा सामाजिक आणि आर्थिक अडचणी आमच्याही असल्याची खंत सुधा यांनी व्यक्त केली.