शाळेच्या मदतीला माजी विद्यार्थी सरसावले

students
students

केडगाव (पुणे) : केडगाव ( ता.दौंड ) येथील जवाहरलाल विद्यालयाला अद्ययावत बनविण्यासाठी शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे हात सरसावले आहेत. निमित्त होते माजी विद्यार्थी मेळाव्याचे. प्राचार्यांनी शाळेच्या अडचणी मांडल्या अन् मदतीला सुरवात झाली. मेळावा संपेपर्यंत आकडा चार लाखांवर गेला. मदतीचा ओख पुढेही चालू राहिल. असे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिले आहे.   

जवाहरलाल विद्यालयात 1965 ते 2000 दरम्यान शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. चंद्रकांत शेळके अध्यक्षस्थानी होते. मेळाव्याला अनेकजण पत्नी, मुले, नातवंडांसह आले होते. शाळेत आज पुन्हा वर्ग भरला होता. सावधानतेचा इशारा झाल्यानंतर राष्ट्रगीताने सुरवात झाली. शाळेत अनेक वर्षांनी भेटल्यानंतर मित्रांमध्ये टिंगल, टवाळी, उनाडक्या, हसणे, कोपरखळया, एकमेकांना शिव्या घालणे मनसोक्त चालू होते.  

कार्यक्रमास आमदार राहुल कुल, शाळेचे माजी विद्यार्थी व माजी आमदार रमेश थोरात, दौंड पंचायत समितीचे सभापती झुंबर गायकवाड, संस्थेचे सचिव धनाजी शेळके, सुभाष कुल महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.गोविंदराजे निंबाळकर, माजी प्राचार्य विठ्ठलराव सानप, विद्यार्थी संघाचे समन्वयक व नगररचनाकार दत्तात्रेय काळे आदी उपस्थित होते. या मेळाव्यासाठी महत्वाची भूमिका घेणारे प्राचार्य निजाम शेख यांचा माजी विद्यार्थ्यांच्यावतीने कुल यांनी सत्कार केला. शाळेच्या पहिल्या विद्यार्थीनी सुवर्णा चोपडा यांचा विशेष सन्मान करण्यात आला.  

यावेळी गुणवंत विद्यार्थी, निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी न्यूरो सर्जन डॅा. महेंद्र चित्रे यांनी शाळेच्या जुन्या आठवणी 
मिश्किलपणे मांडल्याने हशा झाला. प्राचार्य निंबाळकर यांनी, परिस्थिती बदलली असल्याने माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी शाळेच्या व शिक्षकांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज असून प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेला एक पुस्तक भेट दिले पाहिजे असे मत मांडले. शाळेचे माजी विद्यार्थी व नगररचनाकार दत्तात्रेय काळे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश पासलकर, डॅा. सुनील बारवकर, डॅा. विजय भागवत, सुनीलकुमार शिंदे, सुनीता टेंगले, दत्तू गरदडे, अशोक भांडवलकर आदींनी शाळेला आर्थिक मदत केली.

माजी शिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण म्हणाले, आमची शाळा पुर्वी एका चाळीत भरत होती मात्र ती चाळ नव्हती तो एक आश्रम वाटायचा. आमचे शिक्षक पुस्तक हातात घेऊन शिकवत नव्हते. त्यांचा इतिहास मुखदगत होता. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी मेळावा हा दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित करण्यात येणार आहे. निवृत्त शिक्षकांच्यावतीने विजय रोकडे, आर.एस.गुप्ता, आनंद हिंगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुल कुल, रमेश थोरात, चंद्रकांत शेळके यांची भाषणे झाली. प्राचार्य शेख यांनी प्रास्ताविक केले तर मुकुंद भिसे यांनी सूत्रसंचालन केले. माजी विद्यार्थीनी सुनीता टेंगले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com