प्रवासी जीपच्या करात तफावत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

वडगाव निंबाळकर : प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या काळी पिवळी जीपचा कर पुणे जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयातून वेगवेगळ्या प्रकारे आकारला जात आहे. पुणे कार्यालयात याबाबतची चौकशी केली असता कर आकारणी करणारे कर्मचारीही अनभिज्ञ आहेत. 

वडगाव निंबाळकर : प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या काळी पिवळी जीपचा कर पुणे जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयातून वेगवेगळ्या प्रकारे आकारला जात आहे. पुणे कार्यालयात याबाबतची चौकशी केली असता कर आकारणी करणारे कर्मचारीही अनभिज्ञ आहेत. 

ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोईसाठी जीपला ठरावीक आसनक्षमतेसाठी प्रवासी वाहतुकीचे परवाने परिवहन विभागाने दिले होते. 2004 नंतर प्रवासी वाहतूक परवाने ग्रामीण भागासाठी बंद करण्यात आले. सध्या पुणे जिल्ह्यात सुमारे 238 परवानाधारक जीप आहेत. यामध्ये 169 वाहने पासिंगसाठी आरटीओ कार्यालयात जातात. त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने कर आकारणी केली जात आहे. परवाना घेतल्यापासून जीपला प्रतिआसन शंभर रुपयांप्रमाणे कर आकारणी केली जात होती. यानंतर दोन वेळा करवाढ झाली. यामध्ये काळी पिवळी जीप कराबाबत परिपत्रकात स्पष्ट उल्लेख नसल्याने पूर्वीप्रमाणे म्हणजे शंभर रुपये कर आकारला जात होता. चालू स्थितीत संगणकावरही माहिती न भरल्याने कराची रक्कम येत नाही. यामुळे राज्यातील विविध भागात अशा प्रकारच्या वाहनांची कर आकारणी वेगवेगळ्या प्रकारे केली जात आहे.

बारामती कार्यालयात कराची रक्कम बॅलन्स टॅक्‍स म्हणून स्वीकारली जात आहे. पुणे कार्यालयाकडून प्रतिआसन पाचशे रुपये कर आकारून यापूर्वीच्या कालावधीचा फरक कर वसूल केला जात आहे. यामुळे कराची रक्कम अचानक वाढते. परिणामी, वाहने पासिंगसाठी येत नाहीत. कर आकारणीच्या समस्येबाबत बारामती तालुका परवानाधारक जीप संघटनेचे अध्यक्ष अन्वर मुंडे यांनी पुणे कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला; पण यावर काहीच कारवाई झाली नाही. आकारणी केलेली रक्कम भरा, नाही तर कारवाई केली जाईल, असे सुनावले गेले. 

सरकारकडून आलेल्या माहिती पुस्तिकेप्रमाणे कराची आकारणी केली जात आहे. इतर ठिकाणी केली जात असलेल्या कर आकारणीबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. संगणकावर कराची रक्कम येत नाही. याबाबत संबंधितांना कळविण्यात येईल. 
- संजय राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे 
 

Web Title: expatriates Jeep's tax diversion