शेतमजुरामुळे वाचले बेवारस अर्भकाचे प्राण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नारायणगाव - कांदळी (ता. जुन्नर) येथे अज्ञात व्यक्तीने टाकून दिलेल्या बेवारस नवजात अर्भकाचे प्राण शेतमजूर रवी चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे वाचले. ही घटना रविवारी (ता. २२) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कांदळी येथील वनजमीन परिसरात घडली.

याबाबत नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी माहिती दिली, की कांदळी येथील वन जमिनीलगत शिवशंकर मांडे यांची शेतजमीन आहे. या जमिनीच्या शेजारी असलेल्या गोठ्याजवळ अज्ञात व्यक्तीने पिशवीमध्ये नवजात अर्भक ठेवले होते. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रवी चव्हाण कामानिमित्त गोठ्याजवळ आले, त्या वेळी त्यांना रडण्याचा आवाज आला. त्यांनी पिशवी उघडून पाहिली असता, पिशवीत सुमारे तीन दिवसांचे स्त्री-जातीचे अर्भक आढळून आले. याबाबतची माहिती त्यांनी स्थानिक नागरिकांना दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अर्भकाला उपचारासाठी नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी हे अर्भक रात्री पुणे येथील अनाथ आश्रमात रवाना केले. कांदळी परिसरात भटके कुत्रे, बिबट्यांचा वावर आहे. मात्र, शेतमजूर चव्हाण याने दाखवलेल्या सतर्कतेमुळे नवजात अर्भकाला जीवदान मिळाले. पोलिस अर्भकाच्या आईचा शोध घेत आहेत. याबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी नारायणगाव पोलिस ठाण्याशी (९६२३९ ६१०००) संपर्क साधावा.

Web Title: farmer born baby life saving humanity