बळिराजा, हो खरिपासाठी सज्ज

Farmer-Meeting
Farmer-Meeting

पुणे - जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने येत्या शुक्रवारपासून (ता. १८) जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये खरिपाबाबतचा तालुकास्तरीय आढावा घेऊन संभाव्य नियोजन केले जाणार आहे. शिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन, त्यावर प्रभावी उपाययोजना केल्या जाणार आहेत. 

याच बैठकांमध्ये चारा उपलब्धता आणि पाणीटंचाईचाही आढावा घेण्यात येणार आहे. बैठकांची सुरवात जुन्नर तालुक्‍यातून होणार असून, समारोप बारामती तालुक्‍यात होणार असल्याचे विश्‍वास देवकाते यांनी सांगितले. या बैठकांना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवकाते यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन, त्यावर त्वरित उपाययोजना करता याव्यात, या उद्देशाने दरवर्षी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी तालुकास्तरीय बैठकांचे आयोजन करण्यात येते. तालुका पंचायत समितीच्या मुख्यालयात या बैठका घेतल्या जातात. यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री, जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सर्व सभापती, संबंधित पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीराम पवार आदींसह जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत. 

दृष्टिक्षेपात आढावा बैठका
 गावनिहाय खरीप क्षेत्राची माहिती घेणार  
 तालुक्‍यातील खते व बियाण्यांचे नियोजन व पुरवठा 
 तालुक्‍यातील खरीप पिके, उत्पादन आणि उत्पादकता 
 खरीप हंगामातील कृषी विभागाच्या विशेष कार्यक्रमांची माहिती 
 कृषीविषयक योजनांची माहिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com