शेतमजुराच्या मुलाची दहावीत कामगिरी 

Somnath.jpg
Somnath.jpg

सोमेश्‍वरनगर : "पहाटे तीनला उठून पोरगं ऊस तोडायला यायचं. सकाळी आठला कोपीवर येऊन शिळंपाकं खाऊन शाळेत जायचं. दुपारी शाळेच्या खिचडीवर दिवस काढायचं. कधी कंटाळा नाही केला. हट्ट नाही केला. उलट रोज रात्री चिमणीच्या उजेडात न्हायतर साध्या मोबाईलच्या बॅटरीवर अभ्यास करायचं. तरीबी लई मार्क पडली...आता तुमीच पुढचं बघा...'' हे बोलताना सुशिला रावसाहेब रंधवे या माऊलीचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले होते. 

सोमेश्‍वर कारखाना (ता. बारामती) येथील तळावर सहा बाय सहाच्या पाचटाच्या झोपडीत राहणाऱ्या रावसाहेब व सुशिला रंधवे या स्थलांतरीत ऊसतोड मजूर दांपत्याचा मुलगा सोमनाथ याने दहावीला तब्बल 91.20 टक्के गुण मिळवले आहेत. ऊसतोड करून केटरर्सकडे व शेतात मजुरी करूनही तो सोमेश्‍वर विद्यालयात अडीचशे विद्यार्थ्यांमध्ये चौथा आला आहे. 

रंधवे दांपत्य डोंगरकिणी (ता. पाटोदा, जि. बीड) गावचे. चार एकर जिराईत जमीनही पोटाला घालू शकत नसल्याने सोमेश्‍वर कारखान्यावर ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाले. या परिसरात शिक्षण चांगले असल्याने कारखान्याच्याच जागेत पाचटाची झोपडी बांधून स्थायिक झाले. त्यांचा थोरला मुलगा सचिन ऊस तोडून मजुरी करून डिप्लोमा झाला असून, पंधरा दिवसांपूर्वीच चाकण येथील कंपनीने निकाल येण्याआधी त्यास कामावर घेतले आहे. 

परीक्षेआधी शेवटचे दोन महिने त्याने ऊसतोड बंद केली आणि विवेकानंद अभ्यासिकेत जाऊन अभ्यास सुरू केला. रात्री वीज कंपनीच्या कार्यालयाबाहेरील उजेडात अभ्यास केला. शिक्षकांनीही त्याच्यावर लक्ष ठेवले. यामुळे त्याला नववीत अठ्ठ्याहत्तर टक्के होते, पण दहावीला शेवटच्या दोन महिन्यांत 91.20 टक्‍क्‍यांपर्यंत त्याने झेप घेत गुणवत्ता सिद्ध केली. 

टोमॅटो वाहताना निकाल कळला 
आठ जूनला दहावीचा निकाल दुपारी जाहीर झाला, तेव्हा तो अशोक लकडे यांच्या शेतात आईसोबत टोमॅटो तोडत होता. त्याचा मित्र अर्जुन सपकाळ याने फोन करून 91.20 टक्के पडल्याचे सांगितले. यावर सोमनाथला आणि त्याच्या आईलाही आनंदाश्रू आवरले नाहीत. तरीही काम पूर्ण करून चार वाजता निकाल पाहिला. 



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com