सर्वपक्षीय शेतकरी नेत्यांचे शरद पवार आधारवड - थोरात

Balasaheb-Thorat
Balasaheb-Thorat

बारामती - ‘आज शेतीत कोणतीही अडचण आली, तर सर्वांना एकमेव आधार शरद पवार यांचाच आहे. एवढेच नाही, तर दिल्लीतही भाजपपासून सर्व पक्षांचे शेतकरी नेते पवारसाहेबांकडे आधारवड म्हणूनच पाहतात. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढील काम करावे लागेल,’’ अशा शब्दांत राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

शारदानगर (ता. बारामती) येथील पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार प्रयोगशील शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्यांनी ही कृतज्ञता व्यक्त केली. 
या वेळी आठवणींना उजाळा देताना थोरात म्हणाले, ‘‘केंद्रात शरद पवार कृषिमंत्री होते, म्हणूनच महाराष्ट्रात मी कृषिमंत्री पद घेतले. तो सहा वर्षांचा कालखंड माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता, सन २००७ मध्ये सर्वाधिक उत्पादन व शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले, यामागे पवारसाहेबांचे कर्तृत्व, नेतृत्व व त्यांचा असलेला अभ्यास महत्त्वाचा होता. त्या काळात आम्हालाही निर्णयांच्या अंमलबजावणीत खूप आनंद मिळायचा. मला बऱ्याचदा जवळची मंडळी विचारायची की, मी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जवळचा असूनही कृषिमंत्री पद कसे काय निवडले? खरेतर पवारसाहेब दिल्लीत होते, म्हणूनच मी महाराष्ट्रात कृषिमंत्री पद घेतले होते.

तो कार्यकाळ माझ्या जीवनातील अविस्मरणीय होता, शिवाय देशातला कृषी विभाग व कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालील कृषी मंत्रालयाचा कालखंड सर्वांत चांगला होता, असेच म्हणतील. पवारसाहेब होते, म्हणूनच आम्हाला राज्यातही काहीच कमी पडले नाही. विद्यापीठांमध्ये शिवार फेरीसाठी ४०-५० हजारांपर्यंत शेतकरी येणे ही सहजसोपी गोष्ट नव्हती. मात्र, सर्वच कामांना गती देण्याचे काम पवारसाहेबांनी केले.’’

सन १९६५ ते १९९० चा काळ हा शेतीसाठी खूप महत्त्वाचा ठरला. सहकारी चळवळ फोफावल्यानंतरच्या २५ वर्षांत खूप प्रगती झाली. शेतीतील या प्रगतीच्या क्रांतीचे अग्रदूत खरेतर अप्पासाहेब पवार, मणिभाई देसाई, शरद पवार, वसंतदादा पाटील असे सारेजण होते. आज जेव्हा हरितक्रांतीची चर्चा होते आणि औषध फवारणी करणाऱ्या ७० शेतकऱ्यांचा जीव जातो, तेव्हा पुन्हा एकदा नवा विषय हातात घेऊन काम करावे लागेल, असे वाटते. कीटकनाशकविरहीत अन्न हाच विषय घ्यावा लागेल.
- बाळासाहेब थोरात, माजी महसूलमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com