शेतकऱ्यांचे 1 जूनला पुन्हा आंदोलन  - डॉ. अजित नवले 

ajit navale
ajit navale

पुणे - विविध प्रश्‍नांसाठी शेतकरी एक जून रोजी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. राज्यभरातील सर्व सरकारी कार्यालयांना शेतकरी घेराव घालून आंदोलन करणार आहेत. नाशिक ते मुंबईदरम्यान नुकत्याच काढलेल्या "लॉंग मार्च'मधून मान्य झालेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आणि उर्वरित प्रश्‍नांसाठी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील. अखिल भारतीय किसान सभेने आयोजित केलेल्या या आंदोलनांतर्गत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी देशभरातील दहा कोटी आणि महाराष्ट्रातील सुमारे वीस लाख नागरिकांच्या सह्या गोळा करण्यात येणार आहेत, अशी माहिती सभेचे सचिव डॉ. अजित नवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

या आंदोलनादरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सरकारी कार्यालयांना घेराव घालण्यात येणार आहे. त्यात शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. या आंदोलनादरम्यान गोळा केलेल्या सह्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर सभेकडून देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे. सरकारने "लॉंग मार्च'नंतर दिलेली आश्‍वासने एक महिना उलटूनही पूर्ण न केल्याने आंदोलनाचा इशारा सभेने नुकत्याच झालेल्या बैठकीत दिला आहे. डॉ. ज्ञानेश्‍वर मोटे, डॉ. अजित अभ्यंकर आणि सोमनाथ निर्मळ या वेळी उपस्थित होते. 

एक जून 2017 ला सभेने शेतकऱ्यांचा देशव्यापी संप पुकारला होता. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. तसेच, सहा ते 12 मार्च रोजी राज्यातील शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबईदरम्यान लॉंग मार्च काढला होता. या मार्चचे देशभरात पडसाद उमटले होते. मार्चमध्ये पायी चालून शेतकऱ्यांनी आपल्या संघर्षाला व्यापक धार दिली. त्यात सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. एक महिना उलटूनही त्यातील मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे हे आंदोलन करणार आहोत. 
- डॉ. अजित नवले, सचिव, अखिल भारतीय किसान सभा 

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या 
- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. 
- शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि वीजबिलमुक्त करावे. 
- शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची हमी द्यावी. 
- स्वस्त दरात शेती साहित्य उपलब्ध करून द्यावे. 
- वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून कसत असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात. 
- शेतकऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (पेन्शन) द्यावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com