तुरीचे पैसे मिळाले असते, तर शेतकरी उसाकडे वळाला नसता : राजेंद्रसिंह

टीम ई सकाळ
मंगळवार, 6 जून 2017

'शेतकऱ्यांनी कुठलं पीक घ्यावं' याविषयी सरकारने कायद्याद्वारे कुठलीही सक्ती करू नये. कुठल्या वातावरणामध्ये काय पीक घ्यायचे, याचा निर्णय शेतकऱ्यालाच घेऊ द्यावा; पण योग्य निर्णयासाठी त्यांना मार्गदर्शन आणि आवश्‍यक त्या सुविधा जरूर पुरवाव्या.

पुणे : 'गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सांगितले, की तूर पेरा. शेतकऱ्यांनी ते ऐकले. तुरीचे भरपूर उत्पादन झाले; पण सरकारने तुरीचे पैसेच शेतकऱ्यांना दिले नाहीत. गेल्या वर्षी लातूरमध्ये शेतकऱ्यांनी ऊसाचे पीक घेतले नाही. पण आता या वर्षी तुरीचे पैसे मिळाले नाहीत, तर ते शेतकरी पुन्हा ऊसाकडे वळाले', अशा शब्दांत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.

'वॉटर मॅन' म्हणून ओळख निर्माण केलेले राजेंद्रसिंह यांनी आज (मंगळवार) 'सकाळ'च्या संपादकीय विभागाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पाण्याच्या महत्त्वापासून शेतकऱ्यांचे आंदोलनापर्यंत विविध विषयांवर भाष्य केले. 'शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे' असे सांगत असतानाच 'संप करण्याचीही अहिंसक पद्धत असते. आंदोलन करायचे आहे, तर थोडा धीरही बाळगायला हवा. आंदोलन करताना दूध ओतून देणे, भाज्या फेकून देणे चुकीचे आहे', अशा शब्दांत राजेंद्रसिंह यांनी आक्रमक आंदोलकांनाही कानपिचक्‍या दिल्या.

राजेंद्रसिंह म्हणाले..

  • 'शेतकऱ्यांनी कुठलं पीक घ्यावं' याविषयी सरकारने कायद्याद्वारे कुठलीही सक्ती करू नये. कुठल्या वातावरणामध्ये काय पीक घ्यायचे, याचा निर्णय शेतकऱ्यालाच घेऊ द्यावा; पण योग्य निर्णयासाठी त्यांना मार्गदर्शन आणि आवश्‍यक त्या सुविधा जरूर पुरवाव्या.
  • समस्येवरील तोडगा संघर्षातून नाही, संवादातून निघू शकतो. हा संवाद राज्य आणि समाज या दोघांनीही इमानदारीने करावा लागतो.
  • दूध ओतून देणे हा सरकारचे लक्ष वेधण्याचा योग्य मार्ग नाही.
  • पाण्यावरून युद्ध आता सुरू झाले आहे.