परराज्यांतून भाजीपाल्याची खरेदी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

पुणे : शेतकऱ्यांच्या संपानंतर निर्माण झालेल्या भाजीपाल्याच्या तुटवड्यामुळे दुकाने, फेरीवाले यांनी व्यवसाय बंद ठेवण्यास सुरवात केली आहे. मोठ्या कंपन्या, हॉटेल आदी ठिकाणी मालाचा पुरवठा करणाऱ्यांच्या समोर या तुटवड्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. कंपन्यांना माल द्यायचा कुठून, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. लष्कराच्या विविध संस्थांना भाजीपाला पुरवठा करणाऱ्यांनी चक्क बेळगाव येथे जाऊन शेतमालाची खरेदी केली आहे. 

पुणे : शेतकऱ्यांच्या संपानंतर निर्माण झालेल्या भाजीपाल्याच्या तुटवड्यामुळे दुकाने, फेरीवाले यांनी व्यवसाय बंद ठेवण्यास सुरवात केली आहे. मोठ्या कंपन्या, हॉटेल आदी ठिकाणी मालाचा पुरवठा करणाऱ्यांच्या समोर या तुटवड्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. कंपन्यांना माल द्यायचा कुठून, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. लष्कराच्या विविध संस्थांना भाजीपाला पुरवठा करणाऱ्यांनी चक्क बेळगाव येथे जाऊन शेतमालाची खरेदी केली आहे. 

शेतकऱ्यांच्या संपाचे परिणाम सर्वसामान्य ग्राहकाला भाववाढीच्या रूपाने सहन करावे लागत आहेत; परंतु गुरुवार, शुक्रवार अशा दोन दिवसांत बाजार समितीच्या घाऊक बाजारात घटलेली आवक आणि शनिवारची साप्ताहिक सुटी यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. आवकच नसल्याने किरकोळ विक्रेते मालाची खरेदीच करू शकले नाहीत. काही किरकोळ विक्रेत्यांनी माल घेऊन ठेवला होता, त्यांचा व्यवसाय शिल्लक मालावर सुरू आहे. ज्यांची साठवणुकीची क्षमता नाही असे फेरीवाले, पथारीवाल्यांच्या रोजगारावर मात्र परिणाम होत आहे. शहर आणि उपनगरांमध्ये भाजी विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या कमी झाली आहे. छोट्या प्रमाणात भाजीपाला विक्री करणाऱ्यांसमोर काहीच पर्याय राहिलेला नाही. 

शनिवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांनी संप मागे घेतला, अशी चर्चा सुरू झाली. शेतकऱ्यांचा एक गट अद्याप संप सुरू ठेवण्याच्या भूमिकेत असल्याने शेतमाल उद्या (ता.4) बाजारात येणार की नाही याविषयी किरकोळ विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे.

शनिवारी हडपसर येथील बाजारात भाजीपाल्याची आवक झाली होती. ती नियमित आवकेपेक्षा 25 ते 30 टक्‍क्‍यांनी कमी होती. काही किरकोळ विक्रेते माल खरेदी करण्यासाठी हडपसर येथील बाजारात गेले होते. शेतमालाच्या भावांतील तेजी ही टिकूनच राहिली होती. जेवढा मिळेल तेवढा माल खरेदी करण्यावर किरकोळ विक्रेत्यांनी भर दिल्याचे व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले. किरकोळ विक्रेत्यांकडील पालेभाज्या या शिळ्या झाल्या आहेत, त्यामुळे ग्राहक ते घेत नाहीत. भाजीपाल्याचे भाव वाढलेले असल्याने ग्राहक भाव ऐकून पुढे जात आहेत. ग्राहकदेखील गरजेपुरताच माल खरेदी करीत असल्याचे चित्र दिसत आहे. 

'शेतकरी संपा'विषयी अधिक बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

भाजी पुरविण्याचे आव्हान 
किरकोळ विक्रेत्यांप्रमाणेच भाजीपाला पुरवठादार म्हणून व्यवसाय करणाऱ्यांसमोर आव्हान उभे राहिले आहे. लष्कराच्या विविध संस्थांना भाजीपाल्याचा पुरवठा करणारे मोहम्मद शफी शेख म्हणाले, ''संबंधित अधिकाऱ्यांना संपाविषयीची कल्पना दिली होती. त्यामुळे त्यांचे सहकार्य मिळाले आहे; परंतु त्यांना मालाचा पुरवठा करावाच लागणार असल्याने बेळगाव येथील बाजारात जाऊन आठ टन माल खरेदी केला. तो लष्कराच्या वाहनातून पुण्यात आणवा लागणार आहे.'' 

भाजीपाला आणायचा कुठून ? 
विविध कंपन्यांच्या 'कॅन्टीन'ला पुरवठा करणारे सचिन काळे यांनी सध्या पन्नास टक्केच मालाचा पुरवठा करावा लागत आहे. भाजीपाला कोठून आणायचा, हा आमच्या समोर प्रश्‍न निर्माण झाला आहे. थेट शेतकऱ्यांकडूनदेखील आणणे जोखमीचे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.