कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

पुणे - घाऊक बाजारात तीन ते सहा रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. भाव कोसळल्यामुळे उत्पादनखर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून कांदा पाणी आणू लागला आहे. 

पुणे - घाऊक बाजारात तीन ते सहा रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. भाव कोसळल्यामुळे उत्पादनखर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून कांदा पाणी आणू लागला आहे. 

मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात सध्या प्रतिदिन 70 ते 80 ट्रक इतकी कांद्याची आवक होत आहे. जास्त आवक होत असल्याने भाव कोसळले आहेत. गेल्यावर्षी प्रतिकिलो नऊ ते दहा रुपये इतका भाव मिळाला होता. यंदा हा भाव कमी झाला आहे. एवढा कमी भाव तीन वर्षांपूर्वी झाला होता. याबाबत मार्केट यार्ड येथील अडतदार नीलेश थोरात म्हणाले, ""उत्पादन चांगले असल्याचा हा परिणाम आहे. इतर राज्यातही उत्पादन चांगले असल्याने तेथून मागणी कमी आहे. प्रामुख्याने उत्तरेकडील मागणी कमी झाली आहे. केरळ, कर्नाटक, तमिळनाडूतून कांद्याला मागणी आहे. त्यामुळे किमान तीन ते सहा रुपये इतका भाव मिळत आहे.'' 

टाकळी हाजी येथील शेतकरी पोपट पवार म्हणाले, ""प्रतिएकरात कांदा उत्पादनासाठी 60 ते 70 हजार खर्च येतो. मजुरी, मालवाहतूक, गोणी, तोलाई, हमाली आदी खर्च धरून प्रतिकिलो कमीत कमी दहा रुपये भाव मिळाला तर समाधान वाटते.'' कवठे यमाई येथील शेतकरी विजय पळसकर यांनी कांदा चाळीत साठवणूक करणेही आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे सांगितले. 

कांदा निर्यातीसंदर्भात धोरण हवे 
कांद्यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. प्रक्रिया केलेला कांदा खाण्याची मानसिकता आपल्या देशात नाही. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाकडून याला मागणी कमी असते. कांदा निर्यातीची मागणी कमी झाली आहे. सरकारच्या धोरणांमुळे कांदा निर्यातीवर परिणाम झाला आहे. देशातील उत्पादन आणि गरज या गोष्टी लक्षात घेऊन कांदा निर्यातीचे धोरण ठरविले पाहिजे, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.