पाचवी, आठवीतील विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी - जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

पुणे - 'पाचवीच्या विद्यार्थ्याला दुसरीचा धडा वाचायला न येणे, अशी स्थिती अनेक ठिकाणी दिसून येते. उत्तरेकडील राज्यांमध्ये ही स्थिती प्रामुख्याने निदर्शनास येते. त्यामुळे पुढील काळात इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी मार्चमध्ये परीक्षा घेण्यात येईल. त्यात अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. त्यातही नापास झाल्यास त्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसवायचे की वरच्या वर्गात पाठवायचे, याबद्दलचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्या- त्या राज्यांना असणार आहे. याबाबतच्या विधेयकाला लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल,'' अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

वनभवनामधील "जनसंवाद' या उपक्रमाच्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या विधेयकास येत्या काही दिवसांत मान्यता मिळण्याची चिन्हे आहेत. ही मान्यता मिळाल्यास येत्या शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी होण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा व्हावी, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे, असेही त्यांनी सूचित केले.

ते म्हणाले, 'शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) बदल व्हावा, अशी काही राज्यांची मागणी होती. त्यातून या बदलाचा विचार समोर आला. देशातील 25 राज्यांना कायद्यात बदल हवा होता; तसेच प्रस्तावित विधेयकात नमूद केल्याप्रमाणे पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी जूनमधील पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वरच्या इयत्तेत न पाठविता त्याच इयत्तेत बसवावे, याला 25 राज्यांनी मान्यता दर्शविला आहे.''

"काय आले पाहिजे' यावर पुस्तक
केंद्र सरकार सध्या शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर देत आहे. त्याचबरोबर शिक्षणातून विद्यार्थ्यांना काय उमगले, हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांना भाषा, गणित, विज्ञान, काय- काय आले पाहिजे, हे सांगणारे पुस्तक काढण्यात येत आहे. हे पुस्तक शिक्षक आणि पालकांसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रासह तमिळनाडू, केरळ, तेलंगणा या राज्यांनी त्यांच्याकडे सध्या अस्तित्वात असणारी शिक्षण पद्धतीच कायम ठेवण्याची तयारी दर्शविली असून वरील विधेयकाबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित राज्यांना असणार आहे. राज्य सरकार मान्य करेल, तो निर्णय त्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना लागू असेल.
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री

Web Title: fifth eight student again exam chance