फेसबुकवर पोस्ट लिहून मराठी चित्रपट निर्मात्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

अतुल यांच्या फेसबुक पोस्टवर नमूद केल्याप्रमाणे 'ढोल ताशे' चित्रपटामध्ये त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे कर्जबाजारी झाल्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. दरम्यान, अतुल यांची पत्नी प्रियांका यांच्याशी त्यांचे वारंवार भांडणे होत होते.

पुणे - पत्नीच्या त्रासाला कंटाळून 'ढोल ताशे' मराठी चित्रपटाचे निर्माते अतुल बाजीराव तापकीर यांनी शनिवारी (ता.13) रात्री एरंडवणा परिसरातील हॉटेल प्रेसिडेंट येथे आत्महत्या केली. आत्महत्येसंदर्भात फेसबुकवर पोस्ट शेअर करून ही आत्महत्या केली आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, हॉटेल प्रेसिंडटच्या व्यवस्थापकांकडून नियंत्रण कक्षाला याची माहिती देण्यात आली. रविवारी (ता.14) सकाळी 11 ते साडे अकराच्या दरम्यान हा प्रकार त्यांची खोली उघडल्यानंतर उघडकीस आला. दरम्यान, अतुल तापकीर यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर या संदर्भात पोस्ट टाकली होती.

अतुल यांच्या फेसबुक पोस्टवर नमूद केल्याप्रमाणे 'ढोल ताशे' चित्रपटामध्ये त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे कर्जबाजारी झाल्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. दरम्यान, अतुल यांची पत्नी प्रियांका यांच्याशी त्यांचे वारंवार भांडणे होत होते. तसेच त्यांच्या पत्नीच्या भावांनी त्यांना मारहाण केल्याचेही नमूद केले आहे. याला कंटाळून अतुल यांनी आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.