'शहरातून अवयवदानाचे पन्नास हजार फॉर्म भरून घेणार'

'शहरातून अवयवदानाचे पन्नास हजार फॉर्म भरून घेणार'
'शहरातून अवयवदानाचे पन्नास हजार फॉर्म भरून घेणार'

पुणे: 'जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन' (जीपीए) पुण्यातील 'रिबर्थ संस्थे'च्या सहकार्याने वर्षभर अवयवदान मोहिम राबविणार असून, त्यानुसार अवयवदानाचे शहरातून पन्नास हजार फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. या मोहिमेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. पहिल्याच दिवशी 500 फॉर्म भरून अवयवदान या सामाजिक उपक्रमाची दणक्यात सुरुवात करण्यात आली. अवयवदानाचे प्रमाण 10 हजार व्यक्तिंमागे अवघे 1 इतके अल्प आहे. यासाठी सर्वांच्या सहकार्याने ही मोहिम प्रभाविपणे राबविण्यात येणार असल्याचे डॉ. दरक यांनी सांगितले.

डॉक्टरांना 'व्यवसाय' या गटात मोजले जात असले तरी त्यांनी नैतिक मूल्ये विसरता कामा नये. धन्वंतरिच्या मूर्तिसमोर घेतलेल्या शपथेशी प्रतारणा होऊ न देता आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रविंद्र कोल्हे यांनी केले.

'जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन'च्या (जीपीए) नवीन कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभात ते बोलत होते. यावेळी निष्कर्ष लॅबचे प्रमुख डॉ. राम साठ्ये, डॉ. स्मिताताई कोल्हे, नवनियुक्त अध्यक्ष डॉ. प्रवीण दरक, उपाध्यक्ष डॉ. संगीता खेनट, मावळते अध्यक्ष डॉ. संतोष गोसावी, डॉ. संजय वाघ, डॉ. एच्. सी. सोनवणे, डॉ. धनश्री वायाळ, डॉ. रूपा अगरवाल, व अभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित होते

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारुन डॉ. दरक यांनी कार्यकारिणीत डॉ. संगीता खेनट (उपाध्यक्ष), डॉ. रूपा अगरवाल (खजिनदार), डॉ. धनश्री वायाळ (सचिव), डॉ. शिवाजी कोल्हे (सचिव), डॉ. हरिभाऊ सोनवणे (सहसचिव), डॉ. शुभदा जोशी (सहसचिव) यांची निवड जाहीर केली. तसेच अवयवदानासोबतच डॉक्टरांसाठी व्याख्याने, डॉक्टर आणि रुग्ण यांसाठी 'आरोग्यम संपदा' हे नियतकालिक, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम वर्षभर राबविणार असल्याचे जाहीर केले.

समाजातील 99 टक्के डॉक्टर चांगले काम करत असूनही 1 टक्का चुकीच्या डॉक्टरांमुळे डॉक्टरी व्यवसाय बदनाम होत असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी नमूद केले. ते म्हणाले, "नकारात्मक गोष्टीकड़े दुर्लक्ष करुन माध्यमांनीही डॉक्टरांच्या चांगल्या गुणांची दखल घ्यावी. यातूनच नवीन पिढी घडणार आहे." यावेळी डॉ. कोल्हे यांनी मेळघाटातील कामाचा खडतर पट उलगडून दाखवला. उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. स्मिता कोल्हे या मेळघाटातील डरकाळी फोडणारी वाघिण असा उल्लेख करत त्यांनी केलेल्या कामाला मी केवळ मूक संमती दिल्याचेही डॉ. कोल्हे यांनी नमूद केले. त्यांच्यामुळेच आदिवासी भागातील कुपोषणाचा प्रश्न उच्च न्यायालयाच्या माध्यमातून मार्गी लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. स्मिता कोल्हे यांनी आदिवासी भागातील सामाजिक परिस्थितिचा यावेळी आढावा घेतला. आदिवासी समाजात स्रीभ्रूणहत्या होत नाही, वृद्धाश्रमाची गरज नाही, स्री धनाचे संरक्षण केले जाते, हुंडाबळी होत नाही, आदिवासी स्री निर्भय असल्याचा उल्लेख त्यांनी केला. डॉ. साठ्ये यानीही यावेळी मनोगत व्यक्त केले. डॉ. रूपा अगरवाल यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com