‘संविधान सन्मान मूक मोर्चा’ची तयारी अंतिम टप्प्यात

savidhan-morcha
savidhan-morcha

पुणे - शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व समाजघटकांनी एकत्र येत ‘संविधान सन्मान मूक मोर्चा’चे आयोजन केले आहे. येत्या रविवारी (ता. २७) हा मोर्चा होणार असून, याची तयारी अंतिम टप्प्यात पोचली आहे. मोर्चा व्यवस्थित पार पडण्यासाठी चार हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच मोर्चाचा मार्गही निश्‍चित करण्यात आला आहे.

विविध समाज घटक व समूहाच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी, संविधानाच्या चौकटीत ते सुटावेत, यासाठी आणि भारतीय संविधानाचा जागर करण्यासाठी पुणे जिल्हा पातळीवर हा मोर्चा आयोजित केला आहे. मागील महिन्यापासून याची तयारी सुरू होती. पुणे शहर, पिंपरी- चिंचवड व पुणे जिल्ह्यात प्रत्येक समूह घटकांच्या बैठका सुरू आहेत.

प्रत्येक समूहात सव्वाशेपेक्षा अधिक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैद्यकीय व कायदेविषयक क्षेत्रातील लोकांसमवेत स्वतंत्र बैठका होत आहेत. मोर्चामध्ये महिला, विद्यार्थी, कामगार संघटना नव्याने सहभागी होत आहेत. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी व आयोजकांच्या बैठका होत आहेत.

‘संविधान सन्मान मूक मोर्चा’च्या नियोजनासाठी चार हजार स्वयंसेवकांची निवड केली आहे. सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांनी भवानी पेठ येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे व्यायामशाळेच्या पटांगणात स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास सकाळी अकरा वाजता सर्व समाजातील विद्यार्थिनी पुष्पहार अर्पण करतील. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून मोर्चास प्रारंभ होईल. विधान भवनासमोर हा मोर्चा गेल्यानंतर विद्यार्थिनींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. दोन विद्यार्थिनींचे भाषण आणि राष्ट्रगीतानंतर दुपारी दीड वाजता मोर्चाचा समारोप होईल.

शहरात रविवारी वाहतुकीत बदल
शहरात २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘संविधान सन्मान (मूक) मोर्चा’दरम्यान मुख्य मार्गासह काही रस्त्यांवर वाहतूक सकाळी आठपासून आवश्‍यकतेनुसार बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
मोर्चाची सुरवात रविवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता गरवारे पूल येथून होईल. खंडुजीबाबा चौक, टिळक चौकातून लक्ष्मी रस्त्याने संत कबीर चौक येथून डावीकडे वळून पॉवर हाउस चौकातून उजवीकडे वळून समर्थ पोलिस ठाणे, बॅनर्जी चौकातून उजवीकडे वळून नेहरू मेमोरिअल समोरून आंबेडकर पुतळा येथून पुढे इस्कॉन मंदिरापासून हॉटेल ब्ल्यू नाईल समोरून उजवीकडे वळून कौन्सिल हॉल चौक येथे समारोप होईल.

दरम्यान, सोलापूर रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता आणि पुणे- मुंबई रस्त्याने शहरात येणाऱ्या वाहनांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा.

हे रस्ते बंद राहतील...
लक्ष्मी रस्ता- मोर्चा कौन्सिल हॉल येथे जाईपर्यंत
फर्ग्युसन रस्ता- खंडुजीबाबा चौक ते चाफेकर चौकापर्यंत
बाजीराव रस्ता- पूरम चौक ते शिवाजी रस्ता
जंगली महाराज रस्ता- स. गो. बर्वे चौकात बंद राहणार
कर्वे रस्ता- नळस्टॉप चौकातून पुढे बंद राहील
केळकर रस्ता- आवश्‍यकतेनुसार बंद राहणार
नेहरू रस्ता- सेव्हनलव्हज्‌ चौकातून पुणे स्टेशनकडे बंद राहील
टिळक रस्ता- आवश्‍यकतेनुसार बंद राहील

नागरिकांनी मोर्चाच्या मार्गावर वाहने शक्‍यतो आणू नयेत. सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा. मोर्चाचा समारोप कौन्सिल हॉल येथे होणार असल्याने, त्या परिसरातील रस्ते बंद राहतील.
- डॉ. प्रवीण मुंढे, उपायुक्त, शहर वाहतूक शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com