‘टाटा मोटर्स’चा वेतन करार अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

पिंपरी - पिंपरीमधील टाटा मोटर्समध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा कामगारांच्या वेतन कराराचा प्रश्‍न लवकरच सुटणार आहे. येत्या गुढीपाडव्याला टाटा मोटर्सच्या कामगारांना त्या संदर्भातील गोड बातमी मिळण्याची शक्‍यता आहे. रविवारी (ता. २६) टाटा मोटर्सचे व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामध्ये त्या संदर्भात चर्चा झाली. त्यामध्ये कामगारांना तीन वर्षांचा वेतनवाढ करार करण्याचे निश्‍चित झाल्याचे समजते. कामगारांना दरमहा आठ हजार सहाशे रुपये (फिक्‍स) आणि आठ हजार सातशे रुपये (व्हेरिएबल) वाढ देण्याचे ठरले आहे. मात्र, या संदर्भातील अधिकृत घोषणा व्यवस्थापनाकडून होणे बाकी आहे.

पिंपरी - पिंपरीमधील टाटा मोटर्समध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा कामगारांच्या वेतन कराराचा प्रश्‍न लवकरच सुटणार आहे. येत्या गुढीपाडव्याला टाटा मोटर्सच्या कामगारांना त्या संदर्भातील गोड बातमी मिळण्याची शक्‍यता आहे. रविवारी (ता. २६) टाटा मोटर्सचे व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामध्ये त्या संदर्भात चर्चा झाली. त्यामध्ये कामगारांना तीन वर्षांचा वेतनवाढ करार करण्याचे निश्‍चित झाल्याचे समजते. कामगारांना दरमहा आठ हजार सहाशे रुपये (फिक्‍स) आणि आठ हजार सातशे रुपये (व्हेरिएबल) वाढ देण्याचे ठरले आहे. मात्र, या संदर्भातील अधिकृत घोषणा व्यवस्थापनाकडून होणे बाकी आहे. सध्या कंपनीमध्ये १२ दिवसांचा ब्लॉक क्‍लोजर घेण्यात येतो, त्यामध्ये सहा दिवसांची वाढ करून तो अठरा दिवस करण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला असल्याचे समजते. नव्या वेतन कराराचा फायदा कंपनीमधील सात हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. 

टाटा मोटर्समधील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा करार गेल्या १९ महिन्यांपासून रखडला होता. गेल्या आठवड्यात कंपनीचे अध्यक्ष रतन टाटा यांनी पिंपरीमधील कंपनीला भेट दिली होती, त्या वेळी कामगार संघटनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली होती. अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा हा वेतनवाढीचा प्रश्‍न मार्गी लावण्याची विनंती केली होती, त्यानंतर कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामधील चर्चेला गती मिळाली. 

कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात सुरू असणाऱ्या चर्चेमध्ये काही मुद्द्यांवर एकमत होत नव्हते, त्यामुळे हा करार अडकून पडला होता. वेतनवाढ मिळत नसल्यामुळे कामगारांनी दीड महिना नाश्‍ता आणि जेवण घेण्यावर बहिष्कार घातला होता, त्यामुळे कंपनीमधील वातावरण काही काळ बिघडले होते. आता वेतन कराराची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून त्या संदर्भातील अधिकृत घोषणा व्यवस्थापनाकडून कधी होते, याच्या प्रतीक्षेत कामगारवर्ग आहे. 

कामगारांचा वेतनवाढ करार रखडल्यामुळे त्यांना १९ महिन्यांचा पगाराचा फरक मिळण्याची देखील शक्‍यता आहे. कामगारांच्या वेतनवाढीच्या कराराचा प्रश्‍न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे कामगारमंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांनी मध्यस्थी केली होती.