अंगुलीमुद्रा ‘अंगठाछाप’

अनिल सावळे
गुरुवार, 27 एप्रिल 2017

तंत्रज्ञानाअभावी फिंगर प्रिंट्‌सवरून गुन्ह्यांची उकल करण्यात मर्यादा

सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडलेली घटना -

दारू पिताना झालेल्या भांडणात एकाने मित्राच्या डोक्‍यात दगड घालून खून केला; परंतु तो नेमका कोणी केला, याचा शोध पोलिस घेत होते. गुन्हे शाखेच्या अंगुलीमुद्रा विभागाने घटनास्थळावरून घेतलेल्या दारूच्या बाटलीवरील संशयिताच्या बोटांचे ठसे (फिंगर प्रिंट्‌स) मृताच्या मित्राच्या बोटांच्या ठशांशी हुबेहूब जुळले आणि हाच मारेकरी आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध करणे शक्‍य झाले. 

तंत्रज्ञानाअभावी फिंगर प्रिंट्‌सवरून गुन्ह्यांची उकल करण्यात मर्यादा

सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडलेली घटना -

दारू पिताना झालेल्या भांडणात एकाने मित्राच्या डोक्‍यात दगड घालून खून केला; परंतु तो नेमका कोणी केला, याचा शोध पोलिस घेत होते. गुन्हे शाखेच्या अंगुलीमुद्रा विभागाने घटनास्थळावरून घेतलेल्या दारूच्या बाटलीवरील संशयिताच्या बोटांचे ठसे (फिंगर प्रिंट्‌स) मृताच्या मित्राच्या बोटांच्या ठशांशी हुबेहूब जुळले आणि हाच मारेकरी आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध करणे शक्‍य झाले. 

गेल्या वर्षभरात अंगुलीमुद्रा विभागाने अशा प्रकारे सहा गंभीर गुन्हे उघडकीस आणले. मात्र या विभागातील संगणक प्रणाली २०११ पासून बंद आहे. संशयित आरोपींच्या नमुन्यांची तपासणी ‘मॅन्युअली’ केली जात असल्याने गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणावर मर्यादा येत आहेत.

गुन्हेगार कितीही चालाख असला, तरी तो काही ना काही तरी पुरावा मागे ठेवतोच. नेमका तो पुरावा शोधून गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्याचे काम पोलिस करीत असतात. शहर गुन्हे शाखेच्या अंगुलीमुद्रा विभागाला गेल्या वर्षभरात दोन खून, बलात्कार आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. 

शहरात घरफोडी, चोरी, दरोडा, खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न अशा विविध स्वरूपाचे गुन्हे घडत असतात. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्‍लेषण शाखेच्या मदतीने गुन्हे उघडकीस आणले जातात. घटनास्थळी गुन्हेगाराने हाताळलेल्या वस्तू, रक्‍त, कपडे, बटण, डोक्‍याचे केस आदी सूक्ष्म शास्त्रीय पुरावे शोधले जातात. तसेच आरोपींचे ठसे घेतले जातात. त्याची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. त्यावरून गुन्ह्यातील आरोपी हाच आहे, हे पुराव्यानिशी शोधून काढणे शक्‍य होते. हे शास्त्रीय पुरावे न्यायालयात गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाचे ठरत आहेत.

तंत्रज्ञानाची गरज
सीआयडी आणि अंगुलीमुद्रा विभागाकडे गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशांचा डाटा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. नमुन्यांची तपासणी ‘मॅन्युअली’ करण्यात कर्मचाऱ्यांचा बराच वेळ जातो. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. जेणेकरून संशयित आरोपींच्या बोटांच्या ठशांची तपासणी वेगाने होऊन गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण वाढविणे शक्‍य होईल. 

गुन्ह्यांची उकल करण्यात अंगुलीमुद्रा विभागाचे काम समाधानकारक आहे. ते अधिक प्रभावी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पुरेसे तंत्रज्ञ कर्मचारी उपलब्ध करून देण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- पी. आर. पाटील, पोलिस उपायुक्‍त, गुन्हे शाखा 

फॉरेन्सिक मोबाइल व्हॅनची मदत
शहर गुन्हे शाखेकडे अद्ययावत फॉरेन्सिक मोबाइल व्हॅन उपलब्ध आहे. त्यामुळे एखादा गुन्हा घडल्यास या विभागातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा करणे शक्‍य झाले आहे. या व्हॅनमध्ये पुरावे गोळा करण्याचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

केवळ पाच कर्मचारी! 
शहरात जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे घडतात. अंगुलीमुद्रा विभागात सध्या केवळ पाच कर्मचारी आहेत. त्यात फिंगर प्रिंट्‌स तज्ज्ञ, वैज्ञानिक सहायक आणि छायाचित्रकार यांचा समावेश आहे. शहराची व्याप्ती, लोकसंख्या आणि गुन्हेगारी पाहता या विभागात तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.