'रेव्ह पार्टी नव्हे; कलेतून बाहेर पडू दे खदखद'

'रेव्ह पार्टी नव्हे; कलेतून बाहेर पडू दे खदखद'

पुणे - "" मला माहितेय, तुमच्या मनात खूप खदखद साठलीय. खूप काही बाहेर पडू पाहतंय तुमच्या आतून. हरकत नाही; पण ते कुठच्या चुकीच्या मार्गाने बाहेर नका काढू... ती खदखद बाहेर पाडायला नाटक करा. संगीतसाधना करा. उत्तम खेळ खेळा, ट्रेकिंग करा ! कला तुम्हाला फक्त आनंदच देणार नाहीत, तर जगण्याकडे पाहण्याची नवी दिशाही देतील. या दिशेला तुमची ऊर्जा वळवली, तर मला खात्री आहे की, भविष्यात "रेव्ह पार्टी'वर कधीही रेड करावी लागणार नाही...'' अशा विचारप्रवर्तक शब्दांत तरुणांचे आयकॉन असणारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी तरुणांशी संवाद साधला... 

सामाजिक-आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी कृत 44 व्या फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात नांगरे-पाटील बोलत होते. एरवी हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणारा "फिरोदिया'चा पारितोषिक वितरण सोहळा यंदा प्रशासनातील "हीरो' असणारे नांगरे-पाटील तसेच पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांच्या उपस्थितीमुळे वेगळा ठरल्याचे पाहायला मिळाले. 

तरुणांच्या गर्दीने आणि उत्साही जल्लोषाने तुडुंब भरलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा सोहळा सोमवारी रंगला. या वेळी उद्योजक अरुण फिरोदिया, जयश्री फिरोदिया, सूर्यकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते. व्हीआयटी महाविद्यालयाच्या विजेत्या संघास प्रथम करंडक प्रदान करण्यात आला, तर एस. पी. महाविद्यालय आणि पीआयसीटी महाविद्यालय यांना द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके देण्यात आली. 

नांगरे-पाटील म्हणाले, ""फिरोदिया करंडकातील नाटक पाहून मी शब्दशः स्तिमित झालो. चाळीस मिनिटांत एवढे काही डोळ्यांपुढून गेले, की काय सांगावे. आपले हे सारे करायचे राहूनच गेले, याची काहीशी चुटपूटसुद्धा मनाला लागली. या 14 विद्या आणि 64 कलांच्या आविष्काराला मी सलाम करतो!'' तर, कुणाल कुमार यांनी समाजातील वंचित मुलांसाठी काहीतरी सकारात्मक कार्य करण्याचा सल्ला युवकांना दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com