पहिल्या यादीकडे इच्छुकांचे लक्ष 

pmc_election_logo
pmc_election_logo

पुणे - महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची व्यूहरचनात्मक तयारी सुरू झाली असून, कार्यकर्त्यांचे लक्ष लवकरच जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीकडे लागले आहे, त्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या हालचाली ठरतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आता संपल्या आहेत. तर, भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. 

भाजप- शिवसेना युतीबाबत वरिष्ठ नेत्यांनी अद्याप मौन बाळगले आहे, तशीच अवस्था कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीबाबत आहे. त्यामुळे महापालिकेच्या संपूर्ण म्हणजे 41 प्रभागांमधील 162 जागांसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत, त्यातून पहिली यादी जाहीर होण्याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. 

मुलाखत दिल्यानंतरही पक्षाने उमेदवारी नाकारल्यास बंडखोरी करण्याच्या तयारीतही काही उमेदवार आहेत, त्यामुळे अंतिम याद्यांवर लक्ष ठेवून पुढील पर्यायांची चाचपणीही इच्छुक उमेदवार करीत आहेत. प्रभागांमधील जातीची समीकरणे देऊन कोणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पटवून दिले आहे, तर कोणी प्रभागातील स्थानिक उमेदावर असल्याने मतदारांच्या जवळ असल्याचा दावा केला आहे. विकासकामे हीच आपली ओळख असल्याचेही काही इच्छुकांनी आत्मविश्‍वासाने सांगितले आहे. त्यामुळे निवडून येण्याचा निकष या आधारावर पहिली यादी पुढील काही दिवसांमध्ये जाहीर होईल. त्यानंतरच्या याद्या टप्प्या-टप्प्याने जाहीर होतील. तोपर्यंत आघाडी आणि युतीचा निर्णय दोन्ही बाजूंनी स्पष्ट झालेला असेल, असेही सूत्रांनी सांगितले. 

उद्‌घाटनांचा धडाका 
सत्ताधारी पक्षांनी आणि प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांनी केलेल्या विकासकामाच्या उद्‌घाटनांचा धडाका पुण्याच्या वेगवेगळ्या भागांत सुरू आहे. गेल्या चार दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आदी शहरात विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी येत आहेत, त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

मतदारांच्या घरभेटी सुरू 
विद्यमान नगरसेवकांना पक्ष पुन्हा संधी देईल, अशा विश्‍वासाने कार्यकर्त्यांसह नेत्यांनी मतदारसंघातील मतदारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेण्याचा धडाका लावला आहे. या कार्यकाळात प्रभागामध्ये केलेली विकासकामे लोकांना आवर्जून सांगितली जात आहेत. त्याचबरोबर पुढील कार्यकाळातही विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी पुन्हा संधी द्यावी, असे आवाहनही केले जात आहे. 

आचारसंहिता दोन दिवसांत? 
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता 5 जानेवारीपर्यंत लागेल, असा अंदाज प्रशासकीय स्तरावर व्यक्त होत होता, त्यामुळे विकासकामांची उद्‌घाटने, भूमिपूजने दरम्यानच्या काळात झाली. आता आचारसंहिता येत्या दोन दिवसांत लागण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे, त्याकडे प्रशासन आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com