'पाण्या'मुळे गाजली पहिलीच सर्वसाधारण सभा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा महापौर मुक्ता टिळक यांचा प्रशासनाला आदेश

पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा महापौर मुक्ता टिळक यांचा प्रशासनाला आदेश
पुणे - 'अपुरा आणि अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, अवेळी म्हणजे, पहाटे तीन- साडेतीन वाजता पाणी येते, तेही अर्धा-पाऊण तासच, पाणीपुरवठ्याबाबत अधिकारी तक्रारी ऐकूनही घेत नाहीत, उन्हाळा असल्याने महिलांचे हाल होत आहेत,' अशा अडचणींची सरबत्ती करीत, महापालिकेच्या नव्या सभागृहातील पहिल्याच सर्वसाधारण सभेत सदस्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर बोट ठेवले. दोन वेळा नव्हे, तर एकवेळही पुरेसे पाणी येत नसल्याची तक्रारही त्यांनी केली.
दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा महापौर मुक्‍ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तिचे कामकाज सुरू होताच, भाजपच्या वर्षा तापकीर यांनी आपल्या प्रभागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. 'प्रभागाच्या परिसरात समान पाणीपुरवठा होत नाही, वेळापत्रकानुसार पाणी येत नाही,'' अशी तक्रार अविनाश साळवे यांनी केली. नाना भानगिरे म्हणाले, 'महंमदवाडीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे, त्यावर उपाययोजना कराव्यात.'' सातववाडी, गोंधळेनगरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, त्यामुळे महिलांची गैरसोय होत असल्याचे वैशाली बनकर, मारुती तुपे यांनी सांगितले. शहराच्या सर्व भागांतील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी योगेश मुळीक यांनी केली.

'शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. प्रत्यक्षात मात्र, त्यानुसार पाणीपुरवठा होत नाही,'' असे दत्ता धनकवडे, विशाल तांबे यांनी सांगितले. सचिन दोडके म्हणाले, 'वारजे- कर्वेनगर भागातील पाणीपुरवठ्यासाठी पाण्याची टाकी बांधली आहे. मात्र, तिचे काम अपूर्ण असल्याने उपयोग होत नाही. ती कार्यान्वित करावी.'' सुजाता शेट्टी, हरिदास चरवड, अजय खेडेकर, अमृता बाबर, अमोल बालवडकर, सुशील मेंगडे आदींनीही पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी केल्या.

शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठा केंद्रांमध्ये कामे सुरू आहेत, त्यामुळे ज्या भागांत पाणी येत नाही, अशा भागांतील पाणीपुरवठा सुरळीत होईल. त्याकरिता उपाययोजना सुरू आहेत. त्याबाबत संबंधित पाणीपुरवठा केंद्रातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना सूचना केल्या जातील, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

परस्परविरोधी घोषणाबाजी
राज्य सरकारने पुणे मेट्रोसाठी अर्थसंकल्पात 130 आणि स्मार्ट सिटीसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल भाजपच्या सदस्यांनी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करून सभा तहकूब करण्याची सूचना महापौरांकडे दिली. त्याचवेळी विरोधकांनीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याने त्यांना कर्जमाफी देण्याची विनंती सभेतर्फे राज्य सरकारला करावी असे सांगत, सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परविरोधी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या अभिनंदनाची सूचना स्वीकारत, सभा तहकूब करण्यात आली.

Web Title: first municipal meeting famous by water