"जल बिन मछली' ते "मत्स्यशेती... 

डी. आर. कुलकर्णी
शनिवार, 14 एप्रिल 2018

पुणे - पावसाळा संपताच थेंब थेंब पाण्यासाठी पानवडी आसुसलेली असायची; पण महिलांनी निर्धार केला अन्‌ तीन वर्षांत गाव जलसमृद्ध झाले. "जल बिन मछली' अशी अवस्था होणाऱ्या पानवडीत चक्क मत्स्यशेती बहरली आहे. पाणी अडवल्यानंतर आता "पाणी जिरवा'ची चळवळ सुरू केलीय. 

पुणे - पावसाळा संपताच थेंब थेंब पाण्यासाठी पानवडी आसुसलेली असायची; पण महिलांनी निर्धार केला अन्‌ तीन वर्षांत गाव जलसमृद्ध झाले. "जल बिन मछली' अशी अवस्था होणाऱ्या पानवडीत चक्क मत्स्यशेती बहरली आहे. पाणी अडवल्यानंतर आता "पाणी जिरवा'ची चळवळ सुरू केलीय. 

पुण्यापासून 40 किलोमीटरवर (सासवड- काळदरी रस्त्यावर) असलेल्या पानवडीची ही जलकथा. सातशे लोकवस्तीचे हे गाव. तत्कालीन सरपंच व विद्यमान तालुका पंचायत सदस्य नलिनी लोळे यांच्या नेतृत्वाखाली महिला एकत्र आल्या, तनिष्का गट स्थापन केला आणि ग्रामसभेत जलसंधारणाचा विषय मांडला. पहिल्या वर्षी एका छोट्या बंधाऱ्यातील गाळ काढला, "सकाळ'ने मदत केली. सुमारे तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर गावाने जलक्रांती केली. गेल्या वर्षीचा पावसाळा संपता संपता गावात 45 कोटी लिटर पाणीसाठा झाला. 

तीन वर्षांनंतर 
गावात 2015 पर्यंत सिमेंटचे व मातीचे एकूण 21 बंधारे होते; पण गाळाने भरल्याने ते सपाट झाले होते. त्यातील गाळ काढला. शिवाय, गेल्या तीन वर्षांत सिमेंटचे नवीन दहा बंधारे बांधले. गावातील दोन पाझर तलावांची दुरुस्ती केली, उंचीही वाढविली. या सगळ्यांत मिळून आता अंदाजे 45 कोटी लिटर पाणीसाठा होतो. गावात या वर्षी मार्चअखेरीस 15 कोटी लिटर पाणी शिल्लक आहे. गावातील एका बंधाऱ्यात मत्स्यपालन केले असून, त्यातून काही लाख रुपयांचे उत्पन्न दरवर्षी मिळणार आहे. 

सर्वांसाठी जलसंहिता 
ऊस, केळी यांसारखी जास्त पाणी लागणारी पिके घ्यावयाची नाहीत, असा ठराव ग्रामसभेने केला. शिवाय, पिकांना ठिबक सिंचनानेच पाणी देण्याचा निर्धार केला. पाणी पुनर्वापर प्रकल्पही गावाने हाती घेतला आहे. आता तीन-तीन पिके निघू लागली आहेत. पाण्यामुळे अतिरिक्त दोनशे एकर जमीन लागवडीखाली आली आहे, अशी माहिती माजी सरपंच हरिभाऊ लोळे यांनी दिली. बाहेरगावी स्थायिक झालेले गावकरी आता शेतीसाठी परतू लागले आहेत. पूर्वी टंचाईमुळे गावात मुली देताना लोक विचार करायचे. आता परिस्थिती बदलली आहे, असेही निरीक्षण त्यांनी नोंदविले. 

तनिष्का गट स्थापन केल्यामुळे गावाच्या विकासाला दिशा मिळाली. "सकाळ'चे मार्गदर्शन लाभले. 
- सुषमा भिसे, सरपंच व तनिष्का 

Web Title: fish farming in panwadi village