दरोड्याच्या तपासासाठी पाच पोलिस पथके

दरोड्याच्या तपासासाठी पाच पोलिस पथके

कोरेगाव भीमा - डोंगरगाव (ता. हवेली) येथे गडदे वस्तीवरील दरोड्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह लोणीकंद पोलिसांकडून पाच पोलिस पथकांद्वारे तपास सुरू आहे. मात्र, अद्याप ठोस धागेदोरे मिळू शकलेले नाहीत. दरम्यान, दरोडेखोरांच्या मारहाणीत ठार झालेल्या केरबा भिवा गडदे (वय ७०) यांच्यावर काल सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज याप्रसंगी ग्रामस्थांनी व्यक्त केली. तर, जिल्हा परिषद सदस्या कल्पना जगताप व पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांनीही गडदे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच, या घटनेत जखमी झालेल्या व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुक्ताबाई केरबा गडदे यांच्या प्रकृतीबाबतही माहिती घेतली. 

भीतीचे वातावरण
दरोड्याच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, वाड्यावस्त्यांवर पोलिसगस्त वाढवावी, तसेच सुरक्षेसाठी गावात किमान पोलिस पाटील वा इतरांना गरजेनुसार बंदुकीचे परवाने द्यावेत, अशी मागणी करून स्थानिक सक्षम नागरिकांनी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व अलार्म यंत्रणाही बसवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, सदस्या कल्पना जगताप व पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांनी केली.

सुरक्षेसाठी गावागावांत रात्रगस्तही सुरू आहे; स्थानिक युवकांनीही वाड्या-वस्त्यावर गस्त घालावी.
- प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक, लोणीकंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com