पाच हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त 

पाच हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त 

पुणे : गुजरातहून आलेल्या खासगी बसमधील तब्बल चार हजार 852 किलो इतका भेसळयुक्त खवा पुणे पोलिसांच्या वाहनचोरी विरोधी पथकाने शुक्रवारी जप्त केला. पोलिसांनी बस जप्त करण्याबरोबरच बसचालकासह तिघांना अटक केली. मागील आठवड्यात गुजरातहून पाठविलेला दोन हजार किलो भेसळयुक्त खवा पोलिसांनी जप्त केला होता. 

हिंमतसिंग गोपालसिंग राठोड (वय 45, रा. गुजरात, अहमदाबाद) असे अटक केलेल्या बसचालकाचे नाव आहे. गणेशोत्सवासाठी भेसळयुक्त खवा पुण्यात येत असल्याची माहिती पोलिस नाईक शंकर संपत्ते यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचला. शुक्रवारी नीता ट्रॅव्हल्सची बस (जीजे01 डीवाय 0045) स्वारगेट येथील पौर्णिमा टॉवर येथे आल्यानंतर पोलिसांनी गाडीची तपासणी केली. त्यामध्ये 4 हजार 852 किलो इतका भेसळयुक्त खवा आढळला. त्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी एस. पी. शिंदे, सहायक आयुक्त पी. टी. गुंजाळ, म्हस्के यांनी संबंधित मालाची पाहणी करून कारवाई केली. 

गणेशोत्सवामध्ये शहरात मिठाईची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. त्यासाठी गुजरातमधील व्यापाऱ्यांकडून खवा मागविला जातो. त्यांच्याकडून पुण्यासह मुंबई, नागपूर, हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये खवा पाठविला जातो, मात्र अनेकांकडून भेसळयुक्त खवा पाठविला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

खव्याला दुर्गंधी 
पोलिसांनी जप्त केलेल्या खव्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. संबंधित खवा ट्रॅव्हल्सच्या सामान ठेवण्याच्या जागेत, अस्वच्छतेमध्ये ठेवण्यात आला होता. अनेक दिवस पोत्यामध्ये बांधून ठेवलेला असल्याने त्यास दुर्गंधी सुटलेली होती. कारवाई करणाऱ्या पोलिसांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

व्यापाऱ्यांवर कारवाई होणार का ? 
उत्सवाच्या काळात भेसळयुक्त खवा पाठविण्याच्या प्रकारामध्ये वाढ होते. पोलिसांकडून केवळ बसचालक व अन्य एक-दोघांना अटक केली जाते. मात्र, भेसळयुक्त खवा तयार करणारा व्यावसायिक, माल खरेदी करणारा व्यापारी आणि मिठाई बनविणारे दुकानदार यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही, नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर आता तरी अन्न व औषध प्रशासन, पोलिस कारवाई करणार का ? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

जप्त केलेली बस "नीता ट्रॅव्हल्स'ची नाही 
पोलिसांनी जप्त केलेली बस नीता ट्रॅव्हल्स या कंपनीची नाही, असे कंपनीचे विभागीय व्यवस्थापक ध्वनील संघवी यांनी स्पष्ट केले. "आमच्या बस प्रवासी वाहतूक करतात, मालाची ने-आण करत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com