देहूरोडमध्ये फ्लेक्‍सवर निर्बंध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

देहू - जाहिरातींच्या फ्लेक्‍ससाठी यापुढे कडक नियम बनविण्यात येणार आहेत. त्यासाठी शुल्कही आकारण्यात येईल. शहरातील दहा ते पंधरा ठिकाणीच ते लावण्यास परवानगी देण्यात येईल, तीही एक ते दोन दिवसच. त्यासाठी पोलिसांची परवानगीही जरुरी आहे, असे देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप यांनी स्पष्ट केले. आगामी बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मंजूर करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

देहूरोड शहर फ्लेक्‍समुक्त करण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्ड, पोलिस आणि राजकीय पक्ष यांची मंगळवारी बोर्डाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, देहूरोड उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगूळकर, बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, पोलिस निरीक्षक अरुण मोरे, बोर्डाचे सदस्य हाजीमलंग मारिमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, राहुल बालघरे, रघुवीर शेलार, अरुणा पिंजण, भाजपचे शहराध्यक्ष ॲड. कैलास पानसरे, मनसेचे विनोद भंडारी, शिवसेना शहरप्रमुख महेश धुमाळ आदी उपस्थित होते. बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अली शेख, लहू शेलार, शशिकांत सप्पागुरू, महेश गायकवाड, सूर्यकांत सुर्वे आदी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना बोर्डाने एक दोन दिवस जाहिरातींचे फलक लावण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना दीपक चौगुले यांनी केली.

गुन्हेगारांचे फोटो असलेले बॅनर लावण्यास परवानगी देऊ नये, असे लहू शेलार यांनी सांगितले. महेश गायकवाड म्हणाले, ‘‘महापुरुषांच्या जयंतीच्या बॅनरसाठी दर आकारू नयेत.’’ गणपतराव माडगूळकर म्हणाले, ‘‘न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून फलक लावा. शहर विद्रूप करू नका, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील. गुन्हेगारांचे फ्लेक्‍स लावू दिले जाणार नाहीत.’’

सर्वपक्षीय एकच फ्लेक्‍स
महापुरुषांच्या जयंतीचा सर्वपक्षीय एकच फ्लेक्‍स लावण्यात यावा. तो बोर्ड प्रशासन लावेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप यांनी सांगितले. त्याला या बैठकीमध्ये सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मात्र खर्चासाठी बोर्डाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे.

फ्लेक्‍सबाजीमुळे शहर विद्रूप होत असल्याने नियमावली व कायदा आवश्‍यक असून, त्याचे सर्व राजकीय पक्षांनी पालन करावे. आगामी बोर्ड बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होईल.
- विशाल खंडेलवाल, उपाध्यक्ष, कॅंटोन्मेंट बोर्ड

Web Title: Flex restrictions in Dehuroad