फूल बाजारात जागा अपुरीच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

पुणे - मार्केट यार्ड येथील घाऊक फूल बाजारात जागाच अपुरी पडत असल्याने येथील व्यापारावर परिणाम होत आहे. हंगामाच्या कालावधीत पर्यायीजागाही बाजार समितीकडून उपलब्ध करून दिली जात नसल्याने मालाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

पुणे - मार्केट यार्ड येथील घाऊक फूल बाजारात जागाच अपुरी पडत असल्याने येथील व्यापारावर परिणाम होत आहे. हंगामाच्या कालावधीत पर्यायीजागाही बाजार समितीकडून उपलब्ध करून दिली जात नसल्याने मालाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

घाऊक फूल बाजारात १३३ गाळे असून, येथे ये-जा करण्यासाठी एकच रस्ता आहे. या रस्त्यावरच काही जणांना बाजार समितीने व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आधीच जागा अपुरी पडत असल्याने अडचणीत भर पडली आहे. माल घेऊन येणाऱ्या गाड्या ज्या मार्गाने येतात त्याच मार्गाने त्यांना परत जावे लागते. माल उतरविण्यास पुरेशी जागा मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी नेहमी कोंडी होते. या कोंडीचा ताण शिवनेरी रस्त्यावर पडतो. त्यामुळे बाजाराच्या बाहेरही नेहमीच कोंडीचे चित्र दिसते. विशेषतः सणांच्या कालावधीत जेव्हा फुलांची मागणी आणि आवक वाढते. तेव्हा व्यापाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांना पार्किंग, माल उतरविण्यात अडचणी येतात. बाजार समितीच्या प्रशासनामुळे येथील अतिक्रमण वाढत आहे.  

जेव्हा मालाची आवक जास्त होते त्या दिवशी पर्यायी जागा बाजार समितीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी फूल बाजारातील व्यापारी प्रत्येक वेळी करतात; पण त्यांना जागा दिली जात नाही. आंबा, डाळिंब, कांदा विक्रेत्यांसाठी तात्पुरती शेड उभी केली जाते. त्याचप्रकारे गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, पाडवा आदी सणांच्या कालावधीत अतिरिक्त मालाच्या विक्रीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, असे मत व्यापारी व्यक्त करीत आहे. 

 

नवीन बाजाराने प्रश्‍न सुटतील? 
सध्या अस्तित्वात असलेल्या बाजारातून केवळ पुणे जिल्ह्यातच माल विक्रीला पाठविला जातो. शहर आणि उपनगर भागातील विक्रेते मालखरेदी करण्यासाठी येतात. येथे देशभरातील बाजारात असलेल्या भावाची माहिती शेतकऱ्यांना मिळू शकत नाही. शीतगृहाची व्यवस्था येथे नाही, स्वच्छतागृहांचाही प्रश्‍न गंभीर आहे. अशा अनेक प्रश्‍नांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रस्तावित फुलबाजार उपयुक्त ठरू शकतो असा दावा करीत बाजार समितीने या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. आठ महिन्यांपूर्वी भूमिपूजन झालेल्या या फूल बाजाराच्या कामात अनेक अडचणी उभ्या राहात आहेत. महापालिकेची परवानगी मिळविण्यात आठ महिने गेले. आता व्यापाऱ्यांनी जागा वाढवून मागितल्याने नवीन दोन मजले आणि एक तळमजला वाढविण्याचा प्रस्ताव समितीच्या प्रशासकीय मंडळाने मान्य केला आहे. त्यामुळे या ठिकाणी दहा मजली इमारत उभी राहील. प्रस्तावित कामासाठी सध्या ५० कोटी रुपये इतका खर्च मंजूर झाला असून, त्यात आणखी तेवढीच भर पडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स