दो जिस्म एक जान असणाऱ्या ‘फ्ल्यूट सिस्टर्स’

दो जिस्म एक जान असणाऱ्या ‘फ्ल्यूट सिस्टर्स’

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ला बुधवारी (ता. ७) सुरवात होतेय. यंदाचा महोत्सव हा जसा तरुणांचा आहे, तसाच एका वेगळ्या अर्थाने कौटुंबिक महोत्सव म्हणूनही तो वेगळा ठरणार आहे. त्यात एकाच कुटुंबातले कलाकार एकत्र सादरीकरण करताना अनुभवता येतील. पैकी एक जोडी आहे मूळच्या अलाहाबादच्या सुचिस्मिता-देबोप्रिया या बहिणींची. ‘फ्ल्यूट सिस्टर्स’ म्हणून ख्यातकीर्त असणाऱ्या या दोघी जणी म्हणजे बासरीवादनातली एक सुरेल जोडीच. भेटूया यंदा पहिल्यांदाच ‘सवाई’प्रवेश करणाऱ्या या ‘फ्ल्यूट सिस्टर्स’ना. 

प्रश्‍न - तुमच्या घरात गाण्याचं वातावरण पहिल्यापासूनच होतं. आई-बाबा (रॉबिन आणि कृष्णा चॅटर्जी) गातात. तुम्ही स्वतःही गाणं शिकला आहात; मग बासरीत करिअर करावं असं का वाटलं?
देबोप्रिया -
 बाबांमुळे. त्यांना स्वतःला कधीकाळी बासरी शिकायची होती, पण त्यांना ते नाही जमू शकलं; पण आम्ही बहिणींनी तरी बासरी वाजवावी असं त्यांना मनोमन वाटायचं. त्यांनीच आम्हाला बासरीची ओळख करून दिली. तुम्हाला सांगते, पहिल्यांदा बासरी हातात आली; तेव्हा वाटलंही नव्हतं की आमचं तिच्याशी एवढं सख्य जुळेल म्हणून... पण तसं झालं खरं. समोरच्याला शब्दशः मुग्ध करून टाकणारं हे वाद्य.

तुम्ही बासरी वाजवायला सुरवात केली, त्या वेळी (खरंतर आजही) या क्षेत्रात मुलींचं प्रमाण अगदीच थोडं होतं. तरीही आपण बासरीच शिकायची, असा आत्मविश्‍वास कसा आला? तुम्हाला लोकांचा पाठिंबा होता?
देबोप्रिया -
 खरं सांगायचं तर आम्ही स्वतः बासरी म्हणजे खूप काही वेगळं असं कधी समजलंच नाही. जसं गाणं शिकणं, जसं तबला किंवा सतार शिकणं, तसंच बासरीचं. त्यामुळे आम्ही अगदी सहज ते सुरू केलं. आमचे पहिले गुरुजी पंडित भोलानाथ प्रसन्ना यांनीही आम्हाला बासरीसाठी खूप प्रोत्साहन दिलं. पुढे मग पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनीही आम्हाला तेवढ्याच प्रेमाने आपलं शिष्यत्व बहाल केलं. आम्हाला शिकवलं. हो, पण श्रोत्यांना मात्र त्या वेळी खूप आश्‍चर्य वाटायचं- मुली बासरीवादन करताहेत हे पाहून. त्या वेळी खरंच आम्ही सोडता कुणीही मुली/महिला बासरीवादक आसपास नव्हत्याच.

 ... आणि एकत्र परफॉर्म करायचं कसं ठरलं? एकमेकांच्या सख्ख्या बहिणी मंचावरच्या सख्ख्या ‘फ्ल्यूट सिस्टर्स’ अन्‌ पार्टनर्स कशा बनल्या?
सुचिस्मिता -
 एकेकटं असं आम्ही परफॉर्म करूच शकलो नसतो कधीच. म्हणायला मी देबोप्रियाहून एक वर्षाने मोठी असले, तरी आम्ही नेहमीच एकत्रच सारं काही केलंय. गाणं एकत्र शिकलो, नृत्य एकत्र शिकलो, आवडीच्या वस्तूही सारख्याच असायच्या आमच्या... ते म्हणतात ना- दो जिस्म एक जान- तसंय आम्हा बहिणींचं. आम्ही एक वर्षाचा फरक असणाऱ्या जुळ्या बहिणीच आहोत म्हणा ना! अजून एक- आमच्यात कधीही स्पर्धा नसते. आमची केमिस्ट्री मंचाबाहेर आणि मंचावर सारखीच आहे. अर्थात, आम्ही ‘फ्ल्यूट सिस्टर्स’ बनण्यात आमच्या आईबाबांएवढाच आमच्या दोघींच्या सासरच्यांचाही मोठा वाटा आहे.

तुम्ही ‘वर्ल्ड म्युझिक’चाही अभ्यास केलाय. त्या अनुभवाविषयी सांगा ना.
सुचिस्मिता -
 मला वाटतं, वर्ल्ड म्युझिकमध्ये आढळून येणारा एकाचवेळी अनेक वाद्यांचा मिलाफ (हार्मनी) हा प्रकार अभ्यासता येणं, हे आमचं भाग्य होतं. आम्ही भारतात परतल्यावर बासरी वाजवताना हार्मनीचा काही अंतर्भाव त्यात करता येतो का, असा प्रयत्न करू लागलो. हे एक वेगळेपण आमच्या वादनाची अभिरुची वाढवण्यातही उपयोगी ठरलं.

बासरीचं तुमच्या आयुष्यातलं स्थान?
डेबोप्रिया -
 बासरी म्हणजे आमच्या व्यक्तिमत्त्वाचं बाह्यरूपच आहे. आम्ही बासरीतून जणू गातच असल्याचं समजून ती वाजवतो. बासरीला आमच्यापासून वेगळं करणं शक्‍यच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com