एका पायावर, राजगडचा बालेकिल्ला सर!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

गुंजवणे - जन्मतःच एक पाय नसलेल्या एका अवलियाने रविवारी (ता. 7) कुबडीच्या साह्याने अफाट जिद्द व साहसाच्या जोरावर राजगडचा बालेकिल्ला सर करून उराशी बाळगलेले ध्येय पूर्ण केले. प्रशांत अंकुश शितोळे असे त्याचे नाव असून, आळंदीतील एमआयटी कॉलेजच्या आयटीबीईचा तो विद्यार्थी आहे. 

गुंजवणे - जन्मतःच एक पाय नसलेल्या एका अवलियाने रविवारी (ता. 7) कुबडीच्या साह्याने अफाट जिद्द व साहसाच्या जोरावर राजगडचा बालेकिल्ला सर करून उराशी बाळगलेले ध्येय पूर्ण केले. प्रशांत अंकुश शितोळे असे त्याचे नाव असून, आळंदीतील एमआयटी कॉलेजच्या आयटीबीईचा तो विद्यार्थी आहे. 

 
रविवारी सकाळपासूनच राजगडावर पर्यटक यायला सुरवात झाली होती. या पर्यटकांपैकी चौदा जणांच्या एका ग्रुपमधील प्रशांत कुबडीवर चालत होता. त्याला गड चढताना पाहून लोक कुजबुजू लागले. "हा काय गडावर जाणार ? भल्या-भल्यांना जाणे शक्‍य होत नाही, मग हा कसला जातोय?...‘ दिवसभर संततधार. गडाच्या वाटेवर चिखलच चिखल. पण, प्रशांत मात्र शांपपणे गडावर चढाई करत होता. अफाट आत्मविश्‍वास आणि दांडग्या जिद्दीच्या जोरावर सहकाऱ्यांच्या साथीने त्याच वेगात चालत होता. पद्मावती माचीवर गेल्यानंतर त्याचे काही सहकारी म्हणाले, ""बस! आता आपण येथूनच परतीच्या मार्गाला लागू.‘‘ मात्र, प्रशांत म्हणाला, "बालेकिल्ल्यावर पोचणे माझे ध्येय आहे. तेथे जायचेच.‘‘ मग मात्र सर्व जण त्या दिशेने निघाले... बालेकिल्ल्याचा तासिव कातळाचा कडा अखेर त्याने सर केलाच. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या सदरेच्या पायरीवर मस्तक टेकले, हातातला झेंडा सदरेवर रोवला आणि गर्जना केली... छत्रपती शिवाजी महाराज की जय!
 

तेरा सुवर्ण, एक कास्य
प्रशांत मूळचा साताऱ्यातील आंबेवाडीचा. घरची परिस्थिती बेताची. आई-वडील शेती करतात. पुण्यात तो जिथे शिकतोय तेथेच त्याने झेरॉक्‍स व नेट कॅफे सुरू केले आहे. खेळामध्येही त्याने शिखर गाठले आहे. राज्य पातळीवरील पोहणे, थाळी फेक, गोळाफेक या स्पर्धांमध्ये तेरा सुवर्ण व राष्ट्रीय तिरंदाजीत एक कास्यपदक मिळविले आहे. त्याने आतापर्यंत प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, रायगड हे किल्ले सर केले आहेत. भविष्यात, महाराजांनी उभारलेले सर्व किल्ले त्याला पाहायचे आहेत.