दिवाळीपूर्वी नवीन चार पोलिस आयुक्‍तालये

मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, मीरा भाईंदर आणि अकोला शहराचा समावेश

पुणे - राज्य पोलिस दलाकडून नव्याने पिंपरी-चिंचवडसह चार पोलिस आयुक्‍तालयांची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे. याबाबतच्या निर्णयाची घोषणा राज्य सरकारकडून येत्या दिवाळीपूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

 

पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, मीरा भाईंदर आणि अकोला शहराचा समावेश

पुणे - राज्य पोलिस दलाकडून नव्याने पिंपरी-चिंचवडसह चार पोलिस आयुक्‍तालयांची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे. याबाबतच्या निर्णयाची घोषणा राज्य सरकारकडून येत्या दिवाळीपूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

 

देशात सर्वाधिक पोलिस आयुक्‍तालय असलेले राज्य म्हणून महाराष्ट्र पोलिस दलाची यापूर्वी ओळख होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर येथे पोलिस आयुक्‍तालयांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने १९९८ मध्ये अमरावती आणि रेल्वे मुंबई पोलिस आयुक्‍तालयाची घोषणा केली. या निर्णयानंतर गेली १८ वर्षे नव्याने एकही पोलिस आयुक्‍तालयाची निर्मिती झालेली नाही. दरम्यान, राज्यात बहुतांश शहरांमध्ये औद्योगिक आणि आयटी हबमुळे नागरीकरणाबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी राज्य सरकार पिंपरी-चिंचवडसह कोल्हापूर, मीरा भाईंदर आणि अकोला येथे नवीन आयुक्‍तालयांच्या निर्मितीबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन आयुक्‍तालयांच्या निर्मितीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी या मुद्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नुकतीच चर्चा केली आहे. या प्रस्तावाला अंतिम स्वरूप दिले जात असून, दिवाळीपूर्वी औपचारिक घोषणा होण्याची शक्‍यता आहे. 

 

उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नव्या पोलिस आयुक्‍तालयांच्या निर्मितीसाठी राज्य सरकार जागरूकपणे पावले उचलत आहे. ही बाब ही प्रशंसनीय असून, याबाबत गृह विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात येण्याची शक्‍यता आहे. 

 

गुन्हेगारी वाढली 
चाकण परिसरात औद्योगिकरण वाढल्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. जमीन आणि स्क्रॅपमाफियांमुळे जिल्ह्याच्या तुलनेत निम्मी गुन्हेगारी चाकण परिसरात आहे. तळेगाव दाभाडे एमआयडीसी, आळंदी, देहू रस्ता या परिसरातही नागरीकरण वाढले आहे. कोल्हापूर येथे सुमारे २० वर्षांपासून पोलिस आयुक्‍तालयाची कोल्हापूरवासीयांची मागणी आहे. ठाणे जिल्ह्यात मीरा भाईंदर शहरात दाट वस्ती, समुद्रकिनारा असून, तेथेही गुन्हेगारी वाढली आहे; तर अकोला शहरात सणासुदीच्या काळात संवेदनशील भागात नेहमीच तणावाची स्थिती निर्माण होते. या सर्व बाबींचा उच्चस्तरीय पातळीवर अभ्यास करण्यात आला आहे. 

 

पुणे आयुक्‍तालयाचाही विस्तार
पुणे पोलिस आयुक्‍तालयाचाही विस्तार करण्यात येणार आहे. लोणी काळभोर आणि लोणीकंद ही दोन पोलिस ठाणी आयुक्‍तालयाशी जोडण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलिस आयुक्‍तालयातही काही गावे जोडण्यात येणार आहेत. 

 

नियोजित पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालय कार्यक्षेत्र 
संभाव्य पोलिस ठाणी : पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, वाकड, हिंजवडी, सांगवी, देहू रस्ता, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, निगडी, चिखली, चाकण, दिघी, आळंदी. 

 

राज्यात काही ठिकाणी नव्याने पोलिस आयुक्‍तालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे; परंतु त्यासाठी पायाभूत सुविधा, पुरेसा निधी आणि मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे लगेच पोलिस आयुक्‍तालयाची निर्मिती होईल, असे वाटत नाही. मात्र, त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.
- सतीश माथूर, पोलिस महासंचालक