बिटकॉईन गैरव्यवहार उघड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

बिटकॉईनच्या गुंतवणुकीत फसवणूक झाली असल्यास संपर्क साधा - पुणे पोलिस सायबर सेल 020- 26123346, ई-मेल आयडी crimecyber.pune@nic.in 

पुणे - प्रामुख्याने बेहिशेबी व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या आभासी चलन बिटकॉईनमध्ये देशातील सुमारे 8 हजार नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील हा गैरव्यवहार उघड करण्यात शहर पोलिसांना यश आल्याचे बुधवारी सांगण्यात आले. या गुन्ह्यात सात जणांना अटक झाली आहे, मात्र मुख्य सूत्रधाराने दुबईत पलायन केले आहे. आणखी सात जणांचा शोध कसून सुरू आहे. या गुन्ह्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावरही असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कोट्यवधी रुपयांच्या या गैरव्यवहाराची दखल विविध केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतल्याचे समजते. 

बिटकॉईनबाबत राज्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील एक गुन्हा नांदेडमध्ये, तर पुण्यात दत्तवाडी आणि निगडी पोलिस ठाण्यात उर्वरित दोन गुन्हे दाखल झाले आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सुमारे 15 देशांतील 84 हजार गुंतवणूकदारांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यातून 7 लाख बिटकॉईनमध्ये सुमारे 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे तपासात आढळले आहे. एका बिटकॉईनच्या गुंतवणुकीच्या मोबदल्यात 18 महिन्यांत 1.8 बिटकॉईन देण्याचे आमिष या गुंतवणूकदारांना दाखविण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यांना आभासी चलन सदृश असलेल्या "एम-कॅप'मार्फत परतावा देण्यात आला. एका बिटकॉईनची किंमत पाच लाख ते आठ लाख असून, एम-कॅपची किंमत 13 रुपये आहे. 1.8 बिटकॉईनच्या मोबदल्यात एम-कॅप दिल्याचे उघडकीस आल्यावर, गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. 

शहरात पोलिसांकडे सुमारे 30 गुंतवणूकदारांनी तक्रार दिली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. त्यात सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांचाही समावेश आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणाचा सूत्रधार दिल्लीतील जीबी- 21 कंपनीचा संचालक अमित भारद्वाज असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्यासह अन्य आठ जणांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचा शोध सुरू असून येत्या दोन दिवसांत त्यांना अटक होईल, असा अंदाज आयुक्तांनी वर्तविला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, निरीक्षक अनिल पाटील आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात या पूर्वी आकाश कांतिलाल संचेती (रा. मुकुंदनगर), काजल जितेंद्र शिंगवी (रा. महर्षीनगर), व्यास नरहरी सापा (रा. 1058 भवानी पेठ), तर निगडी पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात हेमंत विश्‍वास सूर्यवंशी (रा. बाणेर), हेमंत बाबासाहेब चव्हाण (रा. हडपसर), अजय तानाजी जाधव (रा. काळेवाडी फाटा), पंकज श्रीनंदकिशोर आदलाखा (रा. दिल्ली) आणि हेमंत चंद्रकांत भोपे (रा. धायरी) यांना अटक झाली आहे. 

आदलाखा हा मोटिव्हेशनला स्पीकर म्हणून काम करतो. त्याने जनसंपर्काच्या माध्यमातून "एक बिटकॉईनच्या मोबदल्यात 1.8 बिटकॉईन 18 महिन्यांत देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविले होते. भोपे गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करतो. त्यानेही आदलाखाच्या साथीने शहरातील अनेक गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भुरळ पाडल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या बाबत पोलिसांनी तपासासाठी विशेष पथकात सायबर क्षेत्रातील तज्ज्ञ पंकज घोडे, प्रणीत कुमार हे मदत करीत आहेत. 

तपासादरम्यान शहर पोलिसांनी तूर्त 32 बिटकॉईन, 79.99 इथर (आभासी चलन) व रोख सुमारे 39 लाख रुपये, अशा एकूण 2 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम डिजिटली लॉक केली आहे. त्या शिवाय 160 बिटकॉईन, 3 लाख एमकॅप, 80 हजार इथरही गोठविण्यात आले आहेत. 

गुन्ह्याची व्याप्ती वाढती 
- 15 देशांतील गुंतवणूकदार 
- 84 हजार गुंतवणूकदारांचे लॉग-इन आयडी- पासवर्ड निष्पन्न 
- 7 लाख बिटकॉईनच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचा अंदाज 
- केंद्रीय तपास यंत्रणांचेही तपासावर लक्ष 

Web Title: Fraud in Bitcoin Investments