प्रचाराच्या रिक्षा नागरिकांसाठी डोकेदुखी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त गल्लीबोळांत फिरणाऱ्या रिक्षांवरील ध्वनिवर्धकाच्या आवाजाबाबत बंधने नसल्याने या रिक्षा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने अडथळा येत असून, पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर फिरणाऱ्या या रिक्षांवर बंधने घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, रिक्षाच्या माध्यमातून बेकायदा प्रचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या आचारसंहिता विभागाने स्पष्ट केले. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली आहे. या मोहिमेत वाहनांचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) निवडणुकीसाठी विविध प्रकारच्या सुमारे साडेसातशे वाहनांना परवानगी दिली असून, त्यात सर्वाधिक 510 रिक्षांचा समावेश आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वाधिक रिक्षांचा वापर होतो. शहरात 510 रिक्षांना परवानगी असली तरी, प्रत्यक्षात दुप्पट रिक्षांच्या माध्यमातून प्रचार होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

ध्वनिवर्धक लावून या रिक्षा पहाटेपासूनच गल्लीबोळांत फिरत आहेत. मात्र, ध्वनिवर्धकाच्या आवाजाची मर्यादा निश्‍चित नसल्याने नागरिक त्रस्त झाल्याच्या तक्रारी आहेत. रिक्षाच्या माध्यमातून प्रचारासाठी सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत परवानगी आहे. मात्र, अनेक भागांत रात्री अकरा-साडेअकरापर्यंत त्या प्रचार करीत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी नेमलेल्या आचारसंहिता कक्षाअंतर्गत वाहनांच्या परवानगीची तपासणी करून त्यांच्यावर कारवाईचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. मात्र, बेकायदा वाहने विशेषत: रिक्षांवर कारवाई होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणुकीच्या दैनंदिन कामाचा ताण असल्याने ही कारवाई करणे शक्‍य नसल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. 

महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी म्हणाले, ""राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी प्रचारात किती वाहने वापरायची आहेत, याकरिता नियमावली आहे. त्यानुसार नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.''

Web Title: Frustrating for the citizens of the election campaign autos