गणेशोत्सवामुळे उद्यापासून रातराणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

पुणे - गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस ध्वनिवर्धक रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे यंदा भाविकांची गर्दी वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने रात्री प्रवाशांच्या सोयीसाठी बुधवारपासून (ता. 7) टप्प्याटप्प्याने 600 जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. नेहमीपेक्षा त्यासाठी पाच रुपये शुल्क जादा आकारण्यात येणार आहे. 

सिंहगड रस्ता, हडपसर, कात्रज, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, मार्केट यार्ड, मुंबई-पुणे रस्ता, आळंदी रस्ता, नगर रस्ता, विश्रांतवाडी, औंध रस्ता, पौड रस्ता, कर्वे रस्ता आदी सर्व प्रमुख मार्गांवर बुधवारपासून रात्री जादा बस असतील. रात्री दहानंतर गर्दी संपेपर्यंत बससेवा सुरू राहणार आहे. त्यासाठी सर्व वाहक व चालकांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. येत्या बुधवार, गुरुवार व शुक्रवारी 315 आणि शनिवारपासून 600 बस रात्रीच्या सेवेसाठी उपलब्ध असतील. नेहमीच्या प्रवासभाड्यापेक्षा पाच रुपये जादा शुल्क घेऊन रात्रीची बससेवा पुरविली जाईल, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.

विनातिकीट प्रवाशांवर वॉच
सकाळपासून मार्गावर असलेल्या बसची सायंकाळी आवश्‍यक असल्यास देखभाल-दुरुस्ती करून रात्रीसाठी त्या सोडण्यात येणार आहेत. जादा बससेवेवर परिणामकारक लक्ष देण्यासाठी पीएमपीचे 50 अधिकारी बुधवारपासून सायंकाळी सातनंतर शहरातील प्रमुख स्थानकांवरही तैनात असणार आहेत; तसेच विनातिकीट प्रवासी पकडण्यासाठी एरवी 10 पथके आहेत. त्यात आणखी 12 पथकांची वाढ केली आहे. त्यात पीएमपीतील कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. गर्दीच्या मार्गांवर विनातिकीट प्रवासी शोधण्याची मोहीम असेल, असेही वाघमारे यांनी नमूद केले.
 
विशेष पथक तयार
पीएमपीच्या रात्र बससेवेची माहिती प्रवाशांना 020-24503355 या दूरध्वनी क्रमांकावर उपलब्ध होणार आहे; तसेच रात्रीची बससेवा सुरळीत राहण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. वाहतूक पोलिसांबरोबर समन्वय साधून गर्दीनुसार कोणत्या मार्गावरील बससेवेच्या मार्गात बदल करायचे, मार्ग बंद करायचे याचे नियोजन हे पथक करणार आहे, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.