पहिल्या दिवशी पुणेकरांची गर्दी ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

पुणे - यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षामुळे चर्चेत असलेल्या गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील रस्ते आणि बाजारपेठा शुक्रवारी गर्दीने फुलून गेल्या. विद्युत रोषणाई, आरती आणि देखाव्यांमुळे शहरातील मानाच्या गणपतींसह अन्य मंडळाच्या गणेशमूर्तींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. 

सकाळपासून जोर पकडलेल्या पावसाने सायंकाळी उघडीप दिल्यामुळे गणेशभक्तांनी गर्दी करायला सुरवात केली. मानाच्या पाच गणपतींच्या आरतीलाही भाविकांनी हजेरी लावली. या वेळी वाहतूक कोंडी व गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. शहरातील मध्यवर्ती लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक, केळकर रस्त्यासह टिळक रस्त्यावर गर्दी दिसत होती. बाजारपेठांमध्ये पूजा साहित्य विक्रेते, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्ससह मोठी हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गर्दीमुळे बाजारपेठांतही चैतन्य दिसत होते. लहान मुलांसह महिला, युवक-युवती, वृद्धांनीही बाप्पाचे दर्शन घेतले. अनेक जण मोबाईलवर गणेशमूर्तीसह देखाव्यांची छबी उतरवीत होते. काही जण फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून मित्र आणि नातेवाइकांना ऑनलाइन गणेशदर्शन घडवीत होती. 

मुख्यमंत्र्यांच्या हजेरीला पुणेकरांची दाद! 
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाच्या आगमनाला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. मानाच्या पाच गणपतींचे दर्शन, आरती, लोकार्पण कार्यक्रम केले. या वेळी पोलिस प्रशासनाकडून गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण केले जात होते. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या आगमनाला उपस्थित भाविकांकडून "गणपती बाप्पा मोरया' घोषणेने दाद दिली जात होती.