मिरवणुकीत आपलेपणाचे दर्शन

मिरवणुकीत आपलेपणाचे दर्शन

पुणे - एकीकडे हजारो नागरिक आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप देत होते; पण दुसरीकडे कोणी मिरवणूक पाहायला येणाऱ्या भक्तांना अन्नवाटप करत होते, तर कोणी वैद्यकीय सेवा पुरवीत होते. यंदाही संस्था- संघटनांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. पोलिस मित्र म्हणून तरुणाईने केलेली मदत असो, वा निर्माल्य गोळा करण्यासाठी विसर्जन घाटांवर केलेली मदत... बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी हजारो हात रविवारी राबत होते. 

आपत्कालीन वैद्यकीय सुविधा असो वा अन्नवाटप... पोलिसांकरिता उभारलेला विश्रांती कक्ष आणि ज्वलंत विषयावर केलेली जनजागृती प्रत्येक उपक्रमातून संस्था- संघटनांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. सकाळपासूनच सामाजिक संस्था- संघटनांनी उपक्रम राबवायला सुरवात केली. मिरवणूक मार्गावरील स्थानिक नागरिकांनी चहा, अल्पोपाहार आणि पिण्याच्या पाण्याची सोय नागरिकांसाठी केली होती. तरुणाईने पोलिस मित्र बनून पोलिसांना सहकार्य केले, तर वैद्यकीय सुविधा पुरविण्यातही त्यांचा सहभाग दिसला. 

संघर्ष सोशल फाउंडेशनतर्फे ‘तंदुरुस्त बंदोबस्त’ उपक्रमांतर्गत पोलिसांना चिक्कीवाटप करण्यात आले. फरासखाना व विश्रामबाग पोलिस ठाण्यातील सुमारे दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांना चिक्कीवाटप केले. विद्या सहकारी बॅंकेतर्फे पोलिस, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक, पोलिस मित्र, अग्निशामक दलातील कर्मचारी आदींसाठी पोलिस श्रमपरिहार केंद्र उभारण्यात आले होते. टिळक चौकात उभारलेल्या या केंद्रात सर्वांसाठी नाश्‍ता, दोनवेळचे जेवण आणि चहाची सोय केली होती. 

श्री वीर सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने दत्तवाडी आणि सिंहगड रस्ता येथील पोलिस ठाण्यातील बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांची जेवणाची सुविधा करण्यात आली, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र धावडे यांनी दिली. सुभाष लोढा फाउंडेशनतर्फे पाच हजार पोलिसांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. 

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे विश्रामबाग-फरासखाना पोलिस स्टेशनच्या आवारात मिनी हॉस्पिटल उभारण्यात आले. डॉ. सुजाता बरगाले, डॉ. यू. के. आंबेगावकर, डॉ. मनीषा दणाणे, डॉ. अनिल शर्मा, संजीवन हॉस्पिटलचे डॉक्‍टर्स आणि संस्थेचे आनंद भट्टड, स्वप्नील देवळे, व जयेश कासट यांनी हा उपक्रम राबवला.

नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा
शहरातील विविध संस्था, संघटनांतर्फे पोलिस कर्मचारी आणि गणेशभक्तांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासतर्फे आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. याचा लाभ ४९७ नागरिकांनी घेतला. डॉ. मिलिंद भोई, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. नितीन बोरा, डॉ. नंदकिशोर बोरसे यांच्यासह १४२ डॉक्‍टर्स आणि सहकारी वैद्यकीय सेवा पुरवीत होते. शेठ ताराचंद रुग्णालय, टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय, रोटरी क्‍लब ऑफ पुणे मिडटाऊन आदींनी उपक्रमाला सहकार्य केले. ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्यावतीने विजय थिएटर आणि नळस्टॉप चौकात मिनी हॉस्पिटल उभारण्यात आले होते. डॉ. राजेंद्र खेडेकर, डॉ. ज्योती पवार, डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके यांच्यासह चमूने सुमारे १३० रुग्णांवर उपचार केले. तसेच, अवयवदानाबाबत जनजागृती केली. मॉडर्न विकास मंडळाने ७३ गणेशभक्तांना वैद्यकीय मदत केली. त्यात डोक्‍यात काच पडलेल्या दोन महिलांचा समावेश होता, अशी माहिती संस्थेचे संस्थापक डॉ. संदीप बुटाला यांनी दिली. नामदार फिरत्या दवाखान्यामध्ये २५० लोकांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यामध्ये पोलिस, होमगार्ड यांच्यासह गणेशभक्तांचा समावेश होता, अशी माहिती अनिल बेलकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com