उरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप

uruli
uruli

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व 'गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप दिला. उरुळी कांचन परीसरात दहा तासाहुन अघिक काळ चाललेली मिरवणूक रात्री अकराच्या सुमारास शांततेत पार पडली. 

उरुळी कांचन येथे सार्वजनिक मंडळांनी गणरायांची रथांतून आकर्षक सजावट करून मिरवणूक काढली. लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या डीजे व गुलालमुक्त विसर्जन मिरवणुकीच्या आहावानाला सर्वच मंडळांनी पाठींबा दिला. डीजेऐवजी पारंपारिक ढोल-ताशा, तुतारी, सनई व टाळांच्या गजरात मिरवणूक पार पडली. मिरवणुकीत लहान मुले-मुली, महिला 
मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास सर्व महत्त्वाच्या गणपतींची मिरवणूक सुरु झाली. 

महात्मा गांधी तरुण मंडळाने 'रुबाब', जय महाराष्ट्र मित्र मंडळाने 'वणवा', तर नवचैत्यन्य मित्र मंडळाने ढोल-ताशा पथकाच्या साथीने गणेशमूर्तीचे विसर्जन केले. अनुपम व भोलेनाथ तरुण मंडळाने अनुक्रमे 'पंढरीची वारी' 'पालखी रिंगण सोहळा' हा हलता देखावा सादर केला. साईनाथ मित्र मंडळाने समधर्मसमभाव, श्रीकृष्ण मित्र मंडळाने वृध्दाश्रम या विषयावर 'धक्का वार धक्का' हे जिवंत देखावा सादर करुन आबालवृध्दासह सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले.  तर जय महाराष्ट्र, शिवछत्रपती, कोहिनूर, श्रीमंत वीर, सोमनाथ या मंडळांनी पारंपारीक वाद्याच्या गजरात व भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला.

अखिल तळवाडी मित्र मंडळाने आणि नाव आझाद तरुण मंडळाने आकर्षक देखाव्यासह गणेशमूर्तीची मिरवणूक काढली. मिरवणुकीत भजनी मंडळ व पारंपारिक वाद्यांचे पथक सहभागी झाले. साईनाथ मित्र मंडळाने फ्लेक्सच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत धूम्रपानाचे दुष्परिणाम सांगितले. 'सर्वधर्मसमभाव' या शब्दाचा संदर्भ घेऊन अनेक समाजप्रबोधनपर 
नाट्यप्रयोग सादर केले.

लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील गणेश विसर्जन सकाळपासून सुरु होते. लोणी काळभोर येथे मुळा-मुठा तीरावर सकाळी नऊपासून गणेशमूर्तीच्या विसर्जनास सुरुवात झाली होती. श्रीमंत अंबरनाथ, राजा शिवछत्रपती, तिरंगा, समता व क्रांतिवीर, त्रिमुर्ती, आदी मंडळांनी मोठी मिरवणूक काढली होती. कदमवाकवस्ती येथील शिवछत्रपती, सम्राट मित्र मंडळाने ढोल-ताशा पथकासमवेत विसर्जन मिरवणूक काढली. घरगुती व मंडळाच्या मिळून सुमारे तीनशे गणेशमूर्ती दान म्हणून मिळाल्या आहेत. यावर्षीची विशेष बाब म्हणजे गणरायाला निरोप देण्यासाठी महिला अग्रस्थानी होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com